जागतिक बँकेच्या पथकाची पूरग्रस्त सांगलीला हुलकावणी

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचा आरोप; तीव्र संताप व्यक्त

सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिह्यांतील महापुराबाबत जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन उपाय योजना करणार आहे असे जाहीर झाले आहे. या संदर्भात जागतिक बँकेचे पाहणी पथक 14 फेब्रुवारीपासून कोल्हापूर जिह्याच्या दौऱयावर येणार आहे. मात्र, या पथकाने सलग पाच-सहा वर्षे महापुराचा जबरदस्त तडाखा बसलेल्या सांगली जिह्याला हुलकावणी दिली आहे. महापुराने सर्वाधिक त्रस्त आणि ग्रस्त झालेल्या या जिह्यामध्ये या पथकाने येणे का टाळले, असा सवाल महापूर कृष्णा महापौर नियंत्रण कृती समितीने उपस्थित केला आहे.

समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना दिले.

निवेदनात म्हटले, कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिह्यांना गेली काही वर्षे महापुराने तडाखा दिला आहे. सांगली जिह्यात तर मनुष्य, वित्त आणि पिकांची अतोनात हानी झाली होती. परंतु, ही पाहणी करण्याचे जागतिक बँकेच्या या पथकाने टाळले आहे. महापूरग्रस्त अशा सांगली जिह्याची पाहणी न करता हे पथक कोणती माहिती घेणार आहे आणि शासनाला कसला अहवाल देणार आहे, असाही सवाल समितीने केला आहे.

फक्त कोल्हापूर जिह्यातच ही समिती पाहणी करणार असल्याची माहिती आणि सांगली जिह्यात पथक येणार नसल्याची माहिती आज समितीच्या शिष्टमंडळाने सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेतली, तेव्हा स्पष्ट झाले. यावरून जागतिक बँकेचे हे पथक तसेच महाराष्ट्र शासन सांगली जिह्याला महापुराने जो तडाखा दिला त्या अत्यंत गंभीर अशा समस्येकडे डोळेझाक करीत आहे असेच यावरून स्पष्ट होते.

यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने सांगली जिह्यातील महापूरग्रस्त शेतकरी आणि नागरिक यांना दिलासा देण्याबाबत नेहमीच टाळाटाळ केली आहे. महापुराची कारणे शोधण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नंदकुमार वडनेरे समितीनेही थातूरमातूर अहवाल देऊन वेळ मारून नेली होती. त्यामुळे प्रत्यक्षात महापुराबाबत गेल्या कित्येक वर्षांत कोणतीही उपाययोजना झालेली नाही. आताही जागतिक बँकेचे पथक फक्त कोल्हापूर जिह्यातील महापुराच्या संदर्भात पाहणी करणार आहे. सांगली जिह्याला मात्र ते भेट देणार नाही, यावरून सांगली जिह्यात महापूर आलाच नव्हता, असे शासनाचे ठाम मत बनल्याचे स्पष्ट दिसते.

महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सांगली जिह्याला जागतिक बँकेच्या पाहणीतून वगळल्यानंतर महाराष्ट्र शासन कोणती उपाययोजना करणार आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. आता काहीतरी थातूरमातूर पाहणी करून शासनाला अहवाल सादर केला जाईल आणि निवडणुकीच्या तोंडावर केवळ कोणत्यातरी घोषणा केल्या जातील, असेच यावरून स्पष्ट होत आहे, अशीही टीका समितीने निवेदनात केली आहे.

सांगली, कोल्हापूरला महापूर, भेट दिली सातारा, सोलापूरला

गेली पाच-सहा वर्षे कोल्हापूर आणि सांगली जिह्याला महापुराचा तडाखा बसला आहे. पण, जागतिक बँकेचे पथक हे महापूरग्रस्त सांगलीला भेट न देता सोलापूर, धाराशिव आणि साताऱयाला भेट देणार आहे.