ऑलिम्पिक सुवर्ण जिंका अन् मालामाल व्हा! जागतिक अॅथलेटिक्स संघटनेकडून 50 हजार डॉलर्स इनाम

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील सुवर्णपदक विजेते मालामाल होणार आहेत.  जागतिक अॅथलेटिक्स संघटनेने सोनेरी कामगिरी करणाऱया सर्व अॅथलिट्सना 50 हजार अमेरिकन डॉलर्सचा रोख पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. जागतिक अॅथलेटिक्स संघटना असा निर्णय घेणारी पहिली आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना ठरली आहे.

पॅरिसमध्ये अॅथलेटिक्समध्ये एकूण 48 क्रीडा प्रकार होणार असून, त्यातील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्याला 50 हजार अमेरिकन डॉलर्सचा रोख पुरस्कार मिळणार आहे. भविष्यात यात वाढ होऊ शकते, तसेच 2028 च्या लॉस एंजल्स ऑलिम्पिकमध्ये रौप्य व कांस्यपदक विजेत्यांनाही रोख पुरस्कार देण्यासाठी जागतिक अॅथलेटिक्स संघटना कटिबद्ध आहे. दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून मिळणाऱया वाटय़ातून तब्बल 2.4 लाख अमेरिकन डॉलर्सचे इनाम खेळाडूंना दिले जाणार आहेत.

पुरस्काराची रक्कम घेताना खेळाडूला जागतिक अॅथलेटिक्स संघटनेची मान्यताप्राप्त प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. डोपिंग टेस्टमध्ये निर्दोष ठरल्यानंतरच खेळाडूंना हे पारितोषिक मिळणार आहे. वैयक्तिक विजेत्याप्रमाणे रिले संघालाही 50 हजार अमेरिकन डॉलर्स ही सारखीच रक्कम मिळेल. ही रक्कम रिले संघातील सर्व खेळाडूंना समान वितरित होईल. 2028 च्या पुरस्काराची रचना व पद्धत लवकरच घोषित करण्यात येईल.

खेळाडूंचा पैसा खेळाडूंना मिळावा म्हणून…

‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून जागतिक अॅथलेटिक्स संघटनेला ऑलिम्पिकसाठी मिळणारा पैसा पुन्हा खेळात आणण्याची प्रक्रिया 2015 पासून सुरुवात झाली. सदस्य महासंघाला ऑलिम्पिक डिव्हिडंड देऊन या प्रक्रियेची खऱया अर्थाने सुरुवात झाली. स्पर्धेचा कणा असणाऱया खेळाडूंना हा पैसा मिळायला हवा, एवढीच आमची या योजनेमागची संकल्पना असल्याची माहिती जागतिक अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सॅबेस्टियन को यांनी दिली.