ठाणे पालिकेची पाणीपट्टी वसुली मोहीम थंडावली

लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीच्या कामात ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने यंदाची पाणीपट्टी वसुली मोहीम थंडावली आहे. पाणीपुरवठा विभागाला दिलेल्या उद्दिष्टांच्या केवळ 21 टक्के वसुली आतापर्यंत झाले आहे. दरम्यान निवडणुका संपताच वसुली करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला2024-25 या आर्थिक वर्षात 225 कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र पाणीपुरवठा विभागाने 4 नोव्हेंबरपर्यंत 47 कोटी 45 लाख 33 हजार 184 पर्यंतची वसुली झाली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून लवकरच उत्पन्न वाढविण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत. त्यानुसार आता पाणी बिल वाटण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली असून लवकरच वसुलीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दर तीन महिन्यांनी पाणीपट्टी बिल पाठवण्यात येतात.

ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक वसुली ही मानपाडा- माजिवडा प्रभाग समितीच्या हद्दीत असून 8 कोटी 91 लाख 82 हजार 325 रुपये झाली आहे. सर्वात कमी वसुली ही 2 कोटी 16 लाख 34 हजार 937 वागळे प्रभाग समितीत हद्दीत झाली आहे.

मीटर बसवूनही झोपडपट्टी भागात प्रतिसाद नाही

पाणी बिलांची वसुली योग्य पद्धतीने व्हावी या उद्देशाने स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यानुसार 1 लाख 14 हजारांहून अधिक मीटर बसवून झाले आहेत, परंतु झोपडपट्टी भागात आजही या मीटरनुसार बिलांची वसुली होताना दिसत नाही. त्यातही पाणी बिलांची वसुली करण्यासाठी अभय योजना हाती घेण्यात आली असली तरीदेखील त्याला फारसे यश आले नसल्याचेच दिसून आले आहे.