गद्दारांना माफी नाही, खरातांच्या विजयाने हे दाखवून दिले; मेहकरमधील जनता 30 वर्षांपासून ठाकरे परिवाराच्या पाठीशी

मेहकर विधानसभा हा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अभेद्य गड आहे. याच मतदारसंघातून प्रतापराव जाधव आणि संजय रायमूलकर यांनी गद्दारी केली होती. मेहकरमधील जनतेने शिवसेनेच्या (उध्दव बाळासोब ठाकरे) सिद्धार्थ खरात यांना निवडून देत सिद्ध केले की मेहकरची जनता उद्धव ठाकरे व ठाकरे परिवारासोबत आहे. तसेच जनता गद्दारांना माफ करत नाही, हेदेखील जनतेने दाखवून दिले आहे.

या मतदारसंघातील प्रतापराव जाधव, संजय रायमूलकर शिवसेनेशी गद्दारी करत मिंधे गटात गेले. तेव्हापासून मेहकरच्या जनतेचा रोष खासदार प्रतापराव जाधव व संजय रायमूलकर या जोडगोळीवर होता. शिवसेनेने, ठाकरे परिवाराने यांना सर्वकाही देत यांनी गद्दारी का करावी हा जनतेचा रोष होता. लोकसभा निवडणुकीत खामगाव, जळगाव जामोद या भाजप बहुल मतदारसंघाने प्रतापराव जाधवांना थोड्या मताने तारले व निवडून दिले. मेहकरच्या जनतेच्या मनात ती सल होतीच. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत गद्दाराला पाडायचा असा निर्णय मतदारांनी घेतला होता. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यापूर्वी मुंबईच्या मंत्रालयातील नोकरीचा राजीनामा देवून मेहकरात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पाठविलेले सिद्धार्थ खरात यांना तीन महिन्याच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेने डोक्यावर घेतले होते. सिद्धार्थ खरात, आशीष रहाटे, किशोर गारोळे व इतर शिवसेना पदाधिकार्‍यांना विश्वासात घेवून गावागावात फिरुन वातावरण निर्मिती केली. मेहकर तहसिलवर निवडणूक जाहिर होण्याच्या आठ दिवस अगोदर काढलेला विक्रमी मोर्चाने वातावरणात रंगत आणली होती. मोर्चातील विक्रमी गर्दी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या व सिद्धार्थ खरातांच्या पाठीशी आहे असे चित्र होते.

अभूतपूर्व विजयी मिरवणुकीतून गद्दारांवर रोष
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिद्धार्थ खरात विजयी होताच ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत गुलाल उधळत प्रचंड घोषणाबाजी करत मेहकर शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित मतदार जनता, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह व जोश पाहण्यासारखा व विरोधक गद्दारांना धडकी भरविणारा होता. एकंदरीत गद्दारांची जुलमी राजवट उलथवून लावली असा रोष मिरवणुकीत दिसत होता.