ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा सुरूच राहणार; सर्वोच्च न्यायालयाचा मुस्लिम पक्षकारांना मोठा झटका

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे याप्रकरणात मुस्लिम पक्षकारांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसी जिल्हा न्यायालयाचा व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी देणारा निर्णय कायम ठेवला होता. याविरोधात मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

17 जानेवारी आणि 31 जानेवारीच्या आदेशानंतर मुस्लिम समुदायाकडून कुठल्याही अडचणीशिवाय नमाज अदा केली जात आहे तर हिंदू पुजाऱयांकडून पूजा केली जात आहे. व्यास तळघर परिसरात हीच स्थिती ठेवणे योग्य आहे जेणेकरून दोन्ही समुदाय निश्चित करण्यात आलेल्या अटींनुसार पूजा करू शकतील असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी करत मुस्लिम पक्षकाराची याचिका फेटाळून लावली होती. यात हिंदू पक्षाला पूजा करण्याचा अधिकार देणाऱया जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते.

18 ऑगस्ट 2021 मध्ये पाच महिलांनी दिवाणी न्यायालयासमोर याचिका दाखल केली होती. मशिदीच्या बाजूला असलेल्या श्रृंगार गौरी मंदिरात रोज पूजा- दर्शनाची मागणी करण्यात आली होती. महिलांच्या या मागणीवर न्यायमूर्ती रवि कुमार दिवाकर यांनी मशीद परिसराचे हिंदुस्थानी पुरातत्व विभागामार्फत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. पुरातत्व खात्याने आपल्या अहवालात ज्ञानवापी मशीद तेथे अस्तित्वात असलेल्या जुन्या मंदिराच्या अवशेषांवर बांधल्याचा दावा केला होता.

हिंदू पक्षकाराचा दावा काय?

यापूर्वी मशिदीच्या तळघरात श्रृंगार गौरी यांची पूजा होत होती. परंतु, 1991 मध्ये हे प्रार्थनास्थळ अधिनियम तयार झाल्यानंतर राज्य सरकारने बंद करून टाकले. परंतु, हिंदू पक्षाने दावा केला होता की ज्ञानवापी मशिदीचे बांधकाम मंदिर तोडून करण्यात आले आहे. त्यामुळे त्यावर हिंदूंना पूजा करण्याचा हक्का दिला जावा. त्यानंतर हे प्रकरण लांबणीवर पडत गेले.

व्यास तळघर नंदीच्या समोर आहे. हे व्यास कुटुंबाचे तळघर आहे. मशिदीच्या तळ मजल्यामध्ये 1993 पर्यंत विधीवत पूजा होत होती. परंतु नोव्हेंबर 1993 मध्ये सरकारकडून येथील पूजा बंद करण्यात आली आणि पुजाऱयांना हटवण्यात आले.