मॅजिक बॉक्स – प्रवास

>>अशोक डुंबरे

चित्रीकरणानिमित्त वेगवेगळ्या भागात जाणे व्हायचे आणि त्या भागाला अनुसरून असणाऱया किंवा त्या-त्या वेळेस उपयुक्त ठरणाऱया वाहनातून प्रवास करता आला, वेगवेगळे अनुभवत घेता आले. शेतातला ट्रक्टर ते विमान अशा सर्वच वाहनांतून केलेला प्रवास आजही लख्ख आठवतो.

दूरदर्शनच्या चित्रीकरणासाठी मी आणि माझ्या सहकाऱयांना वेगवेगळ्या वाहनांतून प्रवास करावा लागला. प्रथमत 1972 मध्ये टीव्ही केंद्र सुरू झाले तेव्हा कार्यालयात फक्त दोन अॅम्बेसडर कार होत्या. त्या डायरेक्टर आणि न्यूजसाठी वापरल्या जायच्या. बाकीच्यांना भाड्याची टॅक्सी करून शूटिंग करायला जावे लागायचे. तोपर्यंत टुरिस्ट कार भाड्याने घेण्याची कल्पना अमलात आली नव्हती. कालांतराने गाडी भाड्याने घेण्यात येत असत आणि चित्रीकरणाच्या टीमला त्या गाडीचा वापर करावा लागत असे. 1973 ला मी ‘आमची माती आमची माणसं’ या कार्पामासाठी मुंबई-कर्जत-खोपोली असा रेल्वेने प्रवास केला. माझ्याबरोबर यशवंत कडोलकर हा कॅमेरामन होता. कर्जतला गाडी बदलून कर्जत-खोपोली ट्रेनमध्ये बसत असू आणि खोपोली रेल्वे स्टेशनला उतरत असू.

आमचा कार्पाम खोपोलीतील भात संशोधन केंद्रावर होता. या केंद्रावर त्याकाळी काही जपानी तज्ञ कार्यरत होते आणि भाताचे अधिक उत्पादन कसे घ्यावे यासाठी काही तंत्र त्यांनी विकसित केले होते. त्या चित्रीकरणासाठी आम्ही त्या वेळी गेलो होतो, परंतु खोपोली रेल्वे स्टेशन आणि संशोधन केंद्र खूप लांब असल्यामुळे आम्हाला सामान घेऊन जाताना खूप कसरत करावी लागत असे. तरीही एकदा पोहोचून आम्ही तो कार्पाम पूर्ण केला. ही आठवण नेहमीच स्मरणात राहा.

1973-74 च्या दरम्यान पुणे येथे कृषी महाविद्यालयात तेव्हाचे कुलगुरू डॉ. नानासाहेब पवार यांच्या शब्दामुळे कृषी विस्तार विभागातल्या कार्यालयात आम्हाला सामान ठेवण्यासाठी एक छोटीशी खोली दिली होती. ‘आमची माती आमची माणसं’चे कार्पाम ग्रामीण आणि कृषीविषयक असल्यामुळे हे योग्यच होते. बरेचसे कार्पाम कृषी महाविद्यालयाच्या शेतात चित्रित करण्यात येत होते. शेत जवळ असल्यामुळे पायी जाणे शक्य होते. गणेश खिंड येथे विभागीय फळसंशोधन केंद्र असे एक ठिकाण होते जिथे फळांचे संशोधन चालायचे. आम्ही तिथे खटारा गाडीतून प्रवास केल्याचे आठवते. माझा मित्र मधुकर देसाई या केंद्राचा प्रमुख होता. तो आदल्या रात्री कृषी महाविद्यालयाच्या आमच्या ऑफिसच्या समोर बैलगाडी आणि गाडीवान पाठवायचा. ‘आमची माती आमची माणसं’ या कार्पामाचे शूटिंग नेहमी सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत उरकायचे कारण त्यावेळी सूर्यप्रकाशही सोयीचा असायचा. डोळ्यांवर ऊन यायचे नाही म्हणून योग्य वाटायचे.

मी आणि कडोलकर आम्ही दोघे सायकलवरून गणेश खिंड येथे पोहोचत असू. चित्रीकरण झाल्यावर परत बैलगाडीने सामान कृषी महाविद्यालयातील विस्तार विभागात पोस्ट केले जायचे आणि आम्हीदेखील सायकलने परत येत असू. हा वेगळा अनुभव होता. कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात त्या वेळी प्राचार्य म्हणून प्रतापचंद्र दुदुस्कर हे माझे गुरू कार्यरत होते. कारण ते मला कॉलेजला असताना डेअरी सायन्स शिकवायला होते. त्यांच्या कॉलेजच्या ‘एनएसएस’चा कॅम्प सातारा येथे सात दिवसांसाठी होता. त्यावर कार्पाम करावा अशी त्यांची इच्छा होती, परंतु त्या वेळी कॉलेजची जीप नव्हती एक मोठी बस होती. ती 50 सिटरची बस कृषी महाविद्यालयाने पुणे येथे पाठवली. मी आणि कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिंग व लाइटिंग असिस्टंट असे चार जणांनी पुणे-सातारा हा प्रवास 50 सिटर बसमधून केला. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर दुसऱया दिवशी सातारा-पुणे असा प्रवास बसने केला. एवढी मोठी बस आणि आम्ही चौघेच बसमध्ये बसायला!

सातारा येथे 1980 च्या दरम्यान विश्वास वाळके नावाचे डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर होते. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विश्वास वाळके आणि मी फॉरेस्टमधल्या शिफ्टिंग कल्टिवेशन या विषयावर कार्पाम आयोजित केला होता. कोयना नगरच्या मागील भागात ज्याला बॅकवॉटर म्हणतात अशा ठिकाणी कार्पाम होता. परंतु तिथे जाणे बोटीशिवाय शक्य नव्हते. फॉरेस्ट खात्याची डिझेलवर चालणारी एक बोट होती. आम्ही महाबळेश्वरच्या पायथ्याशी असणाऱया तापोळा या गावातून हा प्रवास केला आणि पलीकडच्या टोकाला जिथे शिफ्टिंग कल्टिवेशन सुरू होते तिथे पोहोचलो. घनदाट अरण्य होते. पाण्याचा मोठा जलाशय होता. खूप नयनरम्य दृश्य होते. बोटीवरच आमची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर शूटिंग करून रात्री परत तापोळ्याला आमची टीम परतली आणि महाबळेश्वरला मुक्काम केला. हा बोटीचा प्रवास आठवणीत राहिला. दुसरा बोटीचा प्रवास म्हणजे दापोली येथील कृषी विद्यापीठातर्फे रत्नागिरी येथे किशोरी कॉलेजचे प्रशिक्षण सुरू झाले होते. त्या वेळी दापोली येथे डॉ. प्रताप साळवी हे कुलगुरू होते. त्यांनी सुचवले की, रत्नागिरीला जाऊन हा कार्पाम चित्रित करावा. मग आम्ही रत्नागिरीला पोहोचलो आणि तिथून रत्नागिरीवरून गणपतीपुळेपर्यंत समुद्र प्रवास केला होता. त्यावेळी बोटीवरच मासे पकडून ताज्या माशांचे जेवण आम्हाला देण्यात आले होते!

आमच्या विमान प्रवासाची हकिगत आगळीवेगळीच आहे. बीपी सिंग हा माझा आवडता कॅमेरामन होता. तो म्हणायचा, ‘डुंबरे साहेब कामगार विश्व कार्पाम के लिए वो टीम एरोप्लेन से आते जाते है. हम क्यू नही जा सकते.’ मग मी विचार केला की, कसे करता येईल. त्याच वेळेला माझे ओळखीचे कृषी विभागातले अभय फडकेसाहेब मला केमिस्ट्री शिकवायला होते. मी दूरदर्शनला गेल्यानंतरही त्यांचा माझा परिचय तसाच होता. त्यांनी आमच्या या प्रवासाचे नियोजन केले. मला आठवते मी, कॅमेरामन बीपी सिंग, लाइटिंग असिस्टंट शशिकांत सांगवेकर, प्रॉडक्शन असिस्टंट शशिकांत भोसले आणि एडिटर चंद्रकांत कामुलकर असे आम्ही सर्व मिळून बेंगळुरूला विमानाने गेलो. फिल्म सायलेंट शूट करायची होती. तीन दिवस फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता. त्या कंपनीचे तिथे एक प्रयोग शेत होते. तेथे जाऊन शूटिंग केले आणि येताना एक दिवस गोव्याला राहिलो. माझा वाढदिवस 30 मार्च त्या दरम्यानच बंगळुरूला साजरा केला होता. तो क्षण मला अजूनही आठवतो.

एक-दोनदा तर ट्रक्टरने प्रवास केल्याचे आठवते. नगर जिह्यामधल्या एका शेतकऱयाचे शेतावर शूटिंग करायचे होते पण खूप लांब होते. तेथे कार वगैरे जात नव्हती. त्याच्याकडे जीप नव्हती. त्याने आम्हाला अक्षरश ट्रक्टरमध्ये बसवून सामानासकट दोन खेपा करून शेतात नेले होते. नंतर शूटिंग केले. असे विविध प्रकारच्या वाहनांनी प्रवास करून आमच्या युनिटने, सहकाऱयांनी प्रत्येक क्षणांचा आनंद उपभोगला. आता फक्त आठवणी राहिल्या आहेत.

(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत.)