आमच्या कार्यकर्त्यांना गाडायला निघालेल्यांचा राजकीय शेवट याच विधानसभा निवडणूकीत करणार; विनायक राऊत यांचा इशारा

मी जिथे जातोय तिथे कार्यकर्त्यांसह मतदारांचा उत्स्फुर्त पाठींबा मिळत आहे. प्रत्येक मतदार आपल्या मनातील भावना व्यक्त करत गद्दारांना धडा शिकवण्याची भाषा करत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात पक्षांतराचा गाढा अभ्यास असलेले उपरे आमच्या कार्यकर्त्यांना गाडायला निघाले आहेत. त्यांचा राजकीय शेवट याच विधानसभा निवडणूकीत करणार, असा इशारा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार विनायक राऊत यांनी दिला. ते पावस येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.

विनायक राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. सत्तेच्या जोरावर त्यांची मस्ती सुरु आहे. मात्र यांच्या या राजसत्तेला गाडून टाकून भाजपला सत्तेपासून बाहेर खेचू असा इशारा त्यांनी दिला. आता आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ आहे. मात्र, आता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिकेच्या निवडणूका लावाव्यात, जनताच त्यांना गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले. आमदार राजन साळवी हे संघटनेशी प्रामाणिक राहिले म्हणून त्यांची चौकशी लावली जात आहे. त्यांना त्रास दिला जात आहे. पण हेच राजन साळवी पुन्हा आमदार असतील, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला. भाजपच्या कटकारस्थानांना बळी पडून शिंदेनी पक्ष पळवला. चिन्ह घेतले. पण लक्षात ठेवा तुमची गरज संपली असे भाजपला जेव्हा वाटेल तेव्हा ठाण्याच्या खाडीत एकनाथ शिंदेचे भाजपवालेच विसर्जन करतील अशी टिका खासदार विनायक राऊत यांनी केली.

मी दोनवेळा खासदार झालो. माझ्यात काही बदल झाला आहे का? माझ्या संपत्तीत एक इंच जरी जागा वाढली असेल, मालमत्ता वाढली असे, मी टक्केवारी घेतली असेल तर एक पुरावा द्या. माझ्यावर आरोप करायला यांना संधीच नाही. विरोधकांची आज अशी अवस्था झाली आहे की माझ्या विरोधात उभा करायला यांना एक उमेदवार मिळत नाही. माझ्या नादाला लागू नका. येणाऱ्या निवडणूकांमध्ये तुम्हाला गाडून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराच खासदार विनायक राऊत यांनी दिला. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जि.प.चे माजी अध्यक्ष उदय बने, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, विभागप्रमुख किरण तोडणकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.