एनडीए सरकार घाबरले;‘नीट’वर बोलताच राहुल गांधींचा माईक ‘स्पीकर’ने बंद केला

नीट परीक्षा घोटाळय़ावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. या घोटाळय़ाची कसून चौकशी करावी आणि सरकारने याबाबत निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. या मुद्दय़ावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलण्यासाठी उभे राहताच एनडीए सरकारची गाळण उडाली. राहुल गांधी दोन वाक्यही बोलले नाहीत तोच अध्यक्षांनी त्यांचा माईक बंद केला. त्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली. विरोधकांच्या जोरदार आक्रमणामुळे सरकारची कोंडी झाली आणि गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

लोकसभेत सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांतच गोंधळ सुरू झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीटचा मुद्दा उपस्थित करत, सरकारने याप्रकरणी तातडीने निवेदन करावे व विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी मागणी केली. राहुल गांधी बोलत असताना त्यांचा माईक अचानक बंद करण्यात आला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी यांनी माईक बंद केल्याचा आरोप काँग्रेस खासदार दीपेंदर हुड्डा यांनी केला. त्यामुळे अगोदरच सुरू असलेल्या गदारोळात भर पडली. सभागृहाचे कामकाज प्रथम दुपारी बारापर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृह पुन्हा सुरू झाले, पण गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मलिल्कार्जुन खरगे व सभापतींमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. खरगेंनी वेलमध्ये प्रवेश केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यावर संसदीय इतिहासातील हा काळा दिवस आहे, असे म्हणत धनखड यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. दरम्यान, नीटविरोधात संसदेच्या प्रांगणात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य फुलो देवी नेताम यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तरुणांचा आवाज दाबण्याचे षड्यंत्र

राहुल गांधी सभागृहात तरुणांच्या हितासाठी उभे ठाकले आहेत. मात्र अशा गंभीर मुद्दय़ावरून संसदेतील मायक्रोपह्न बंद करून तरुणांचा आवाज दाबण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप करत काँग्रेसने राहुल गांधी आणि ओम बिर्ला यांच्यातील संवादाचा व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे.

नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांनी बोलायला सुरुवात केली, पण काही वेळातच त्यांचा आवाज सभागृहातील सदस्यांना येत नव्हता. माईक बंद असल्याचा आरोप करत सदस्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांना जाब विचारला. मात्र माईकचे बटण माझ्याकडे नसल्याचे उत्तर अध्यक्षांकडून आले. येथे चर्चा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर व्हायला हवी. इतर बाबी सभागृहात नोंदवल्या जाणार नाहीत, असे अध्यक्ष म्हणाले. त्यामुळे गोंधळ वाढत गेला. राज्यसभेतही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचा माईक बंद करण्यात आल्याने खडाजंगी झाली.

अध्यक्षांनी विनंती धुडकावली

नीट घोटाळय़ामुळे देशभरातील विद्यार्थी भीतीच्या छायेत आहे. पुढे काय होणार त्याला माहीत नाही. अशा वेळी त्याला धीर देण्याची गरज आहे. सरकार आणि विरोधी पक्ष या कठीण काळात तुमच्यासोबत आहे, हा विश्वास आणि संदेश संसदेतून दिला गेला पाहिजे. त्यासाठी चर्चा व्हायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी सभागृहात केली, मात्र ही मागणी अध्यक्षांनी मान्य केली नाही.