लाडक्या बहिणींना दिलेला पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणांच्या विधानावरून वडेट्टीवार बरसले

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सरकारी पैशांतून राबवली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळविण्यासाठी बहिणींना फसविण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे. आमदार रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातलं बोलले आहेत. आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मतं विकतील का? सरकारी पैसा हा रवी राणा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आहे काय? असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यातील भगिनींचा अपमान करणारी सत्ताधाऱ्यांची भाषा असल्याने सरकारने बहिणींची माफी मागावी, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सरकारची खरडपट्टी केली आहे.

आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजी नगर येथे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही लाडकी बहिण योजनेचे श्रेय घेत आहेत. यांना दोन वर्षापूर्वी बहीण आठवली नाही. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. त्याबद्दल सरकार बोलत नाही. आता मतासाठी फसव्या योजना आणल्या जात आहेत. राज्य चोरांचे झाले आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरू आहे. कमिशनखोरी 40 टक्क्यांवर गेली आहे. बेरोजगारी वाढली आहे. उद्योग गुजरातला गेले आहेत. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे. शेतकऱ्यांना 15 हजार कोटी रूपये दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.प्रत्यक्षात मात्र 4600 कोटी रूपये दिले. एक नंबरचे राज्य 11 व्या स्थानावर नेले. गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये टक्केवारीवरून शित युद्ध सुरू आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. लोकसभेत यश मिळालं म्हणून शांत बसू नका. विधानसभेत देखील भरघोस यश मिळवायचं आहे, असं आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.