साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात येत्या शनिवार दि. 9 नोव्हेंबरपासून तीन दिवस किरणोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर किरणोत्सवात येणारे अडथळे दूर करावेत, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिकेकडे करण्यात आली आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारपासून तीन दिवस किरणोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने किरणोत्सवाच्या मार्गातील अडथळ्यांची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान या मार्गात रहिवासी तसेच व्यापाऱ्यांनी केलेल्या बांधकामाचे सहा अडथळे आढळून आले असून, ते काढण्यासाठी महापालिकेला पत्र देण्यात आले आहे.
हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून उत्तरायण आणि दक्षिणायनामध्ये दोनवेळा तीन दिवसांचा किरणोत्सव सोहळा होतो. उत्तरायणामध्ये दि. 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारीला, तर दक्षिणायनामध्ये दि.9, 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी होतो.
किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्याची मावळतीची किरणे महाद्वारातून मंदिरात प्रवेश करून देवीच्या चरणांना स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी देवीच्या कमरेपर्यंत जातात, तर तिसऱ्या दिवशी देवीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचतात. सूर्यकिरणांनी देवीच्या मूर्तीला स्पर्श करण्यापूर्वी मंदिरातील सर्व दिवे मालवून मंदिराच्या गाभाऱ्यात केवळ दोन समया तेवत ठेवल्या जातात. किरणोत्सवानंतर देवीची कर्पूराआरती तसेच घंटानाद करण्यात येतो.