टॅक्सीचालक ते मराठी इंडस्ट्रीचा सुपरस्टार

 

रवींद्र महाजनी हे नाव उच्चारताच डोळय़ासमोर येते ते त्यांचे देखणे रूप आणि राजबिंड व्यक्तिमत्त्व. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी मराठी इंडस्ट्री गाजवली. ‘मुंबईचा फौजदार’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, या चित्रपटांनी त्यांना स्टारडम मिळवून दिले. मात्र या एव्हरग्रीन अभिनेत्याने इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी मुंबईत तीन वर्षे टॅक्सी चालवली होती. सर्वसामान्य टॅक्सीचालक ते मराठी इंडस्ट्रीतला हॅण्डसम अभिनेता अशा त्यांच्या प्रवासावर टाकलेला दृष्टिक्षेप… 

शालेय जीवनापासून अभिनयाची आवड

रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा. ज्येष्ठ पत्रकार ह. रा. महाजनी हे त्यांचे वडील. रवींद्र यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. ते शाळा आणि महाविद्यालयातही नाटक, एकांकिकेत भाग घ्यायचे. इंटर सायन्सला नापास झाल्याने महाजनी निराश झाले होते. त्यावेळी वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांनी खालसा महाविद्यालयात बीएला प्रवेश घेतला. तिथेच त्यांची भेट रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर, अशोक मेहता आदींशी झाली.

उदरनिर्वाहासाठी टॅक्सी चालवली

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिनेक्षेत्रात नशीब अजमावण्यासाठी रवींद्र महाजनी यांनी प्रचंड प्रयत्न केला. मात्र वडिलांच्या निधनानंतर घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडल्यामुळे त्यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाईकांकडून त्यांची अवहेलना झाली. त्यांनी जवळपास तीन वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. पण, त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे ते दिवसा वेगवेगळय़ा ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटीगाठी घ्यायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे.

त्या तीन सिनेमांनी दिली अफाट लोकप्रियता

‘मुंबईचा फौजदार’, ‘गोंधळात गोंधळ’ आणि ‘देवता’ या तीन चित्रपटांनी रवींद्र महाजनी यांना खऱया अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. ‘मुंबईचा फौजदार’ या चित्रपटात त्यांनी एका पोलीस अधिकाऱयाची भूमिका केली होती. त्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री रंजना मुख्य भूमिकेत होत्या. ‘गोंधळात गोंधळ’ या चित्रपटात त्यांच्यासोबत प्रिया तेंडुलकर तर ‘देवता’ चित्रपटात त्यांच्यासोबत आशा काळे मुख्य भूमिकेत होत्या. ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’,  ‘दुनिया करी सलाम’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. ‘काय राव तुम्ही’, ‘पॅरी ऑन मराठा’  ‘देऊळ बंद’ आणि ‘पानिपत’ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या.

झुंजमधून मिळाला मोठा ब्रेक  

मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून रवींद्र यांना पहिली संधी मिळाली. त्यातली त्यांची मुख्य भूमिका गाजली. त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठीच ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहिले. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यांचा तो रुबाबदारपणा पाहून तरुणी
फिदा होत.

कर्जाचा डोंगरघरावर जप्ती

मराठी मनोरंजनसृष्टीत एक काळ गाजवणारे रवींद्र महाजनी मोठय़ा कर्जात बुडाले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा गश्मीरने शालेय वयात त्यांचे सगळे कर्ज फेडले होते. अभिनयाव्यतिरिक्त आपला इतर काहीतरी व्यवसाय असावा, या उद्देशाने रवींद्र महाजनी यांनी बांधकाम क्षेत्रात पार्टनरशिप केली, परंतु या क्षेत्रात त्यांची फसवणूक झाली. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. अगदी त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यावेळी गश्मीरची आई कमी पगाराची नोकरी करत होती. घरची ही सगळी परिस्थिती पाहून गश्मीरने कुटुंबाला हातभार लावायचा निर्णय घेतला. गश्मीरने वयाच्या पंधराव्या वर्षी त्याची स्वतःची डान्स अॅपॅडमी सुरू केली. डान्स अॅपॅडमीवर चांगला जम बसला आणि गश्मीरने
कर्ज फेडले.

अजरामर गाणी

‘खेळ कुणाचा दैवाचा कळला’, ‘सहजीवनात आली ही सप्नसुंदरी’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’, ‘हा सागरी किनारा…’, ‘स्वप्नात साजना येशील का’, ‘फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश’, ‘नातं तुझ नी माझं’, ‘पायात पैंजण…पैंजणात घुंगरू’, ‘जाशील कुठे मुली तू…’, ‘वासुदेव आला…’ ही रवींद्र महाजनी यांच्यावर विविध चित्रपटांत चित्रित झालेली गाणी अजरामर ठरली आहेत. रवींद्र महाजनी यांची लोकप्रिय ठरलेली गाणी आजही तरुणाईच्या ओठावर रेंगाळताना दिसतात. विशेष म्हणजे वयाची साठी गाठलेल्या महिलांमध्ये महाजनी यांची आजही तितकीच व्रेझ आहे. अभिनेत्री आशा काळे आणि रंजना यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली.

कुऱहाडीचा घाव अन् सेटवर रक्ताची चिळकांडी

‘सतीची पुण्याई’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी रवींद्र महाजनी यांच्या हाताला मोठी दुखापत झाली होती. या चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूरमध्ये सुरू होते. चित्रपटातील एका सीनमध्ये रवींद्र महाजनी आणि दरोडेखोरांमध्ये मारामारी होते असे दृश्य होते. हा सीन शूट करताना दरोडेखोर असलेल्या कलाकारांच्या हातामध्ये खऱयाखुऱया कुऱहाडी देण्यात आल्या होत्या. ही गोष्ट रवींद्र महाजनी यांना खटकली. त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला खरी कुऱहाड न वापरण्याची सूचना केली, मात्र कोणीही त्यांचे म्हणणे ऐकले नाही. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. हा सीन सुरू असताना दरोडेखोराची व्यक्तिरेखा साकारणाऱया एका कलाकाराच्या हातातील कुऱहाडीचा घाव रवींद्र महाजनी यांच्या हातावर बसला. हा घाव इतका जोरदार होता की, रवींद्र महाजनी यांच्या हातातून रक्ताची चिळकांडी उडाली आणि सेटवर रक्त पसरले होते. प्रत्येकवेळी ही आठवण सांगताना रवींद्र महाजनी शहारून जायचे.

 

 

श्रद्धांजली

एकमेव देखणा नट गमावला – अशोक सराफ 

रवींद्र महाजनी हीरो आणि मी साईडला असे बरेच चित्रपट आम्ही एकत्र केलेत. त्याचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न होते. त्याकाळी रवींद्र महाजनी हा मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव देखणा नट होता. चित्रपटाच्या सेटवर तो नेहमी हसतखेळत वावरायचा, इतरांशी मोकळेपणाने बोलायचा. तो स्वतःला फार मोठा कलाकार मानत नसे. त्याच्या निधनामुळे मी चांगला मित्र आणि मराठी चित्रपटसृष्टीने देखणा नट गमावला आहे.

 

मराठी चित्रपटसृष्टीची हानी – शरद पवार 

आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रवींद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

 

हॅण्डसम नायक हरपला – सुबोध भावे 

मराठी चित्रपटातील माझं व्यावसायिक अभिनेता म्हणून पहिलं पाऊल रवींद्र महाजनी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटातून पडले. अतिशय रुबाबदार, विलक्षण देखणे, खऱया अर्थाने मराठीमधील हँडसम नायक, कायम हसतमुख अशीच तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली आहे. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.

 

गुणी अभिनेत्याची एक्झिट

रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून त्यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.