राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली; विश्वजित कदम यांचा सरकारवर निशाणा

राज्यात वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज, मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या दंगली हे चित्र म्हणजे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली असून गृहखात्याकडे कुणाचं लक्षं नसल्याचा आरोप काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था निश्चितपणे बिघडत चालली आहे. या खात्याकडे कुणाचं लक्षं आहे की नाही असा प्रश्न पडतो, असं विश्वजित कदम म्हणाले. महाराष्ट्रात एक परंपरा आहे की सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र ठेवण्याची शिकवण ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांनी दिली आहे. अशा परिस्थितीत राज्यात आधी वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. मराठा बांधवांवर लाठीचार्ज झाला. जाणीवपूर्ण जाती-धर्मांमध्ये कटकारस्थान रचलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी लोकांनी सुद्धा अफवा आणि चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये. कुठल्याही घटनांना हिंसकवळण लागू नये याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे. घडलेल्या घटनांचा निषेध करतो, असंही त्यांनी सांगितलं.