आईवडिलांनी आधारहीन आरोप केल्यास त्या आधारावर घराचे गिफ्ट डीड रद्द करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाचे गिफ्ट डीड रद्द करण्याचे आदेश रद्दबातल ठरवले.
न्या. आर. एम. जोशी यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी झाली. मुलगा किंवा मुलगी नीट काळजी घेत नाही, मूलभूत गरजा पूर्ण करत नाही या आईवडिलांच्या आरोपांचे ठोस पुरावे सादर न झाल्यास प्राधिकरणाला गिफ्ट डीड रद्द करण्याचा कोणताच अधिकार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. आईवडिलांची फसवणूक करून माझ्या पतीच्या नावाने गिफ्ट डीड करून घेतली की नाही हे ठरवण्याचा अधिकार प्राधिकरणाला नाही. मुळात आई आमच्यासोबतच राहील अशी हमी आम्ही कोर्टात दिल्याचा दावा मुलीने केला. गिफ्ट डीडवर आदेश देण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. जावई आईची काळजी घेत नव्हते, असा स्पष्ट आरोप प्राधिकरणाच्या सुनावणीत करण्यात आला होता. मुळात प्राधिकरण हे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठीच आहे. गिफ्ट डीड रद्द करण्याचे प्राधिकरणाचे आदेश योग्यच आहेत, असा युक्तिवाद आईकडून करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण
आईने मुलीला घर दिले होते. तशी गिफ्ट डीड केली होती. याप्रकरणी दिवाणी दावा सुरू आहे. त्यातही आईने प्रतिज्ञापत्र सादर केले होते. स्वतःच्या मर्जीने व मुलीवर प्रेम असल्याने तिला घर दिल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. मला घर दिल्याचे बहिणीला कळाले. तिने माझ्याविरोधात ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाकडे तक्रार करण्यासाठी आईवर दबाव टाकला. घराची गिफ्ट डीड रद्द करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली. प्राधिकरणाने हे गिफ्ट डीड रद्द केले. त्याविरोधात ही याचिका केली होती.