आजी-आजोबांचे आजपासून घरातून मतदान

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांवरील नागरिक लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या 8 नोव्हेंबरपासून ठाणे जिल्ह्यातील 933 आजी आजोबांचे घरातून मतदान होणार असून निवडणूक यंत्रणा सर्वांच्या घरोघरी पोहोचणार आहे. आपला हक्काचा आमदार कोण असावा हे ठाणे जिल्ह्यातील वृद्ध मतदार ठरवणार आहेत. आजी-आजोबांबरोबरच दिव्यांग बांधवांनादेखील घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय केली आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्हा प्रशासनाची गृह मतदानाची लगबग सुरू झाली असून जिल्हा निवडणूक कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन बॅलेट पेपरवर मतदान करून घेणार आहेत. प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे. मात्र वयोवृद्ध आणि दिव्यांगांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणे शक्य नाही, अशा मतदारांसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उमेदवार उपस्थित राहू शकतो

जिल्हा निवडणूक आयोगाने मतदारसंघ निहाय पथक स्थापन केले आहे. गृह मतदान करताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घेतली असून संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गृह मतदानाच्या वेळी उमेदवार उपस्थित राहू शकतो, अशी माहिती ठाणे शहर विधानसभा निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून सहमती घेण्यासाठी फॉर्म नं 12 ड भरून घेतला. या सर्वांच्या मतदानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येक पथकात 5 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.