‘धोम’च्या डाव्या कालव्यावरील पूल ढासळला; कालव्यातील पाणी व वाहतूक बंद

तालुक्यातील धोम डाव्या कालव्यावर कवठे केंजळ उपसा सिंचन योजनेलगत खानापूर ते शेंदुरजणे यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग ढासळला आहे. यावेळी कालव्यातून सुरू असलेले 100 क्युसेक पाणी ओढ्यातून वाहून गेले. यानंतर विसर्ग बंद करण्यात आला. कोरेगाव तालुक्यातील जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे धोम धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. हा पूल ढासळल्यानंतर कालव्यातील पाणी व वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली.

धोम डाव्या कालव्यातून वाई, सातारा, कोरेगाव तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. पावसाळा सुरू असल्याने या हंगामात कोरेगाव तालुक्यातील जिहे कठापूर व वसना वागंना उपसा सिंचन योजनेच्या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी सोडण्याचे आदेश होते.

यावेळी धोम धरणात पाणीसाठा वाढल्याने जिहे कठापूर योजनेसाठी पाणी सोडण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले होते. वाई, सातारा तालुक्यांत असणारा मुसळधार पाऊस यामुळे कालव्यातून पाणी वाहून नेणे धोक्याचे असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले होते. तरीही 100 क्युसेक पाणी कालव्यातून सोडण्याचे आदेश देण्यात आले. मागील 50 वर्षांत कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध न झाल्याने कालव्यांची अवस्था बिकट झाली आहे. रविवारी सकाळी खानापूर ते शेंदुरजणे यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग ढासळला.

या पुलावरून शेंदुरजणे, खानापूर, निकमवस्ती व आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांकडून वाहतूक सुरू असते. ती वाहतूक आता थांबविण्यात आली आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातून देण्यात आली.