पोर्शे अपघातातील सहआरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण; वडिलांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बहुचर्चित पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन सहआरोपी दारू प्यायला नव्हता हे भासवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. सादर झालेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट होत आहे, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. हे निरीक्षण नोंदवत न्या. मनीष पितळे यांच्या एकल पीठाने या अल्पवयीनसह आरोपीच्या वडिलांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. अरुणकुमार सिंग असे या सहआरोपीच्या वडिलांचे नाव आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांना तीन लाख रुपयांची लाच देऊन सिंग यांनी मुलाला वाचवण्यासाठी पुराव्यांमध्ये फेरफार केली, असा पोलिसांचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण…

पुणे येथे मे-2024 मध्ये ही घटना घडली. आलिशान पोर्शे कार भरधाव चालवत दोन बाईकस्वारांना चिरडले गेले. यातील मुख्य व सहआरोपी अल्पवयीन आहेत. घटना घडली तेव्हा हे दोन्ही आरोपी दारू प्यायले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली. आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय बळ वापरले गेल्याचा आरोप झाला. अल्पवयीन सहआरोपीच्या रक्ताचे नमुने अन्य आरोपी आशीष मित्तलच्या रक्ताच्या नमुन्यासोबत बदलण्यात आले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

लेबलिंग करताना दिशाभूल झाली

कागदपत्रांमध्ये फेरफार करून दिशाभूल करण्यात आली, हा आरोप सिंग यांच्यावर ठेवता येणार नाही. कारण या कटात डॉक्टरसह सर्वच जण सहभागी होते, असा दावा न्यायालयात करण्यात आला. हा दावा न्यायालयाने खोडून काढला. केमिकल एनलायझर अधिकाऱ्याला रक्ताच्या नमुन्यावर लेबल लावण्यास सांगण्यात आले. त्यावेळी ते रक्त कोणाचे आहे हे अधिकाऱ्याला सांगितले गेले नाही. याचा अर्थ त्या अधिकाऱ्याची दिशाभूलच झाली आहे. सिंग यांच्यावर ठेवलेला आरोप योग्यच आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.