आचारसंहितेमुळे म्हाडाच्या दुकानांचा लिलाव लांबणीवर, इच्छुकांना आता 6 जूनपर्यंत अर्ज करता येणार

म्हाडाच्या मालाड, गोरेगाव, पवई, चारकोप येथील 173 दुकानांसाठी होणारा ई-लिलाव आता दोन महिने लांबणीवर पडला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने मुंबई मंडळाने दुकानांचा लिलाव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इच्छुकांना आता 6 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.

घरांसोबत म्हाडातर्फे दुकानेदेखील बांधण्यात येतात. अशा विविध योजनांच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या 173 दुकानांची विक्री करण्यासाठी नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यात मालाड, मालवणी येथील सर्वाधिक 57 गाळ्यांचा समावेश आहे. प्रतीक्षा नगर, शीव येथील दुकानांसाठी 25.50 लाख रुपयांपासून ते 45.50 लाख रुपयांपर्यंत तर गोरेगाव पूर्व बिंबिसार नगर येथील दुकानांसाठी 80 लाखांपासून ते 13.93 कोटी रुपयांपर्यंत बोली निश्चित करण्यात आली आहे. दुकानासाठी म्हाडाने निश्चित केलेल्या बोलीपेक्षा अधिक बोली लावणाऱया अर्जदाराला दुकानाचे वितरण करण्यात येणार आहे.

आतापर्यंत दोनदा मुदतवाढ

सुरुवातीला ई-लिलावासाठी 19 मार्चला ऑनलाईन बोली लागणार होती. त्यानंतर त्याला 5 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आचारसंहितेमुळे आता पुन्हा एकदा दुकानांचा लिलाव दोन महिने लांबणीवर पडला आहे.

173 दुकानांसाठी 1068 अर्ज

म्हाडाच्या 173 दुकानांसाठी आतापर्यंत 1068 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 592 जणांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत तर 449 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.