नवरात्रोत्सवात सर्वत्र जगदंबेचा जागर सुरू असतानाच मिंधे गटाच्या उपविभागप्रमुखाने ठाण्यातील अकरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केला. संतापजनक म्हणजे या प्रकरणात अटक झाल्यानंतर नराधम सचिन यादव हा काही तासांतच जामिनावर सुटला असून तो मोकाट फिरत आहे. या विरोधात आज ठाण्यातील जनतेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. ‘बदलापूरच्या आरोपीचे एन्काऊंटर मग ठाण्याचा तुमचा उपविभागप्रमुख मोकाट कसा?’, असा सवाल संतप्त ठाणेकरांनी मिंधे सरकारला केला.
गुरुवारी संध्याकाळी संतप्त ठाणेकरांनी रस्त्यावर उतरून मिंधे सरकारला जाब विचारला. हजारो ठाणेकर हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. एकीकडे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या उपविभागप्रमुखाला वेगळा न्याय का, असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे. तर बहिणीला अनुदान आणि बालिकेवर अत्याचार हाच का तुमचा कायदा आहे का? असे देखील ठाणेकरांनी मिंधे सरकारला विचारले आहे.
ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी चिमुकली शुक्रवारी दुपारी ट्युशनला जात होती. तेव्हा मिंधे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव (55) याने त्या मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. त्यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीने त्या नराधमाला लांब ढकलले. त्यावेळी यादव याने अश्लील कृत्य केले. पीडित तरुणीने आपल्यासोबत झालेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटकदेखील केली. मात्र दुसऱ्या दिवशी त्याला जामीन मिळाला. पोलिसांवरील राजकीय दबावामुळेच थातूरमातूर कलमे लावल्याने यादवला जामीन मिळाल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणीदेखील होत आहे.