यंदाच्या पावसाळ्यात लाखो ठाणेकरांचा प्रवास खड्ड्यातून होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना सावधान.. गेल्या वर्षीपेक्षा महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे बजेट 50 लाखांनी कापले असून फक्त दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्येक प्रभागनिहाय 50 लाख रुपये कमी मिळणार असल्याने महापालिकेला खड्डे बुजवताना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. निधीच्या कमतरतेअभावी रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच राहिले तर वाहनचालकांसह शाळेत जाणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
ठाणे शहरातील रस्त्यांची कामे 90 टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. यातील बहुतेक रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी डांबरी रस्त्यांचा समावेश आहे. शहरातील रस्ते मजबूत झाले असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी मुसळधार पावसात ठाण्यात खड्डे पडत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. यावर्षी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस येणार असल्याचे अनुमान हवामान विभागाने केले असून धो धो पावसात नव्याने केलेले रस्ते किती तग धरतील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
पैसे पुरतील काय?
ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवास करता यावा म्हणून महापालिका प्रशासनाने दोन टप्प्यांत 605 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे सुरू केली. त्यापैकी 90 टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, पण तरीही पावसाळ्यात खड्डे पडले तर ते तातडीने बुजवण्यासाठी दोन कोटींची तरतूद केली आहे. ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा 50 लाखांनी कमी आहे. एवढे कमी पैसे पुरतील काय तसेच पावसाळ्यात खड्डे पडणारच नाहीत किंवा कमी पडतील असे पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटते काय, असा थेट सवाल नागरिकांनी केला आहे.
– पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडू नये यासाठी महापालिकेने दोन कोटींची तरतूद केली आहे. नऊ प्रभाग समितीअंतर्गत 20 लाख याप्रमाणे ही तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
– निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून ठेकेदारांना वर्कऑर्डरदेखील देण्यात आल्या आहेत. दरम्यान मागील वर्षी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी 2.50 कोटींची तरतूद करण्यात आली होती.
– यावर्षी रस्त्यांची कामे केल्याने खड्डे बुजवण्याच्या बजेटमध्ये 50 लाखांची घट करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे, पण जे रस्ते झाले ते यंदाच्या पावसात किती तग धरतील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
– महापालिका हद्दीत असलेल्या इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांना खड्डे पडल्यानंतरही महापालिकेलाच खड्डे बुजविण्याची वेळ येत असते. मागील वर्षीदेखील त्यांच्या रस्त्यांवरील खड्डे महापालिकेनेच बुजविले होते. यंदाही महापालिकेवर तीच वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.