मुंबई-बडोदा महामार्गासाठी पोलीस बळाचा वापर करून चारच दिवसांपूर्वी तलासरीच्या कोचाई गुरोडपाडा येथील गोरगरीबांना बेघर करण्यात आले होते. मात्र दांडगाई करून सरकारने या प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या असताना अनेकांना मोबदल्याची मात्र फुटकी कवडी दिली नाही. यामुळे घर आणि जमीन गेल्याने हताश झालेल्या एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. लक्ष्मी बरफ (47) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. खोके सरकारच्या पापाचाच हा बळी असून ‘लाडक्या बहिणी’ला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारा, अशी मागणी तलासरीवासीयांनी केली आहे.
मुंबई-बडोदा महामार्ग तलासरी तालुक्यातून जात असून कोचाई गुरोडपाडा येथील 25 ते 30 कुटुंब बाधित होत आहे. मात्र हा प्रकल्प अन्य ठिकाणाहून घ्यावा यासाठी येथील गावकरी – गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करत आहेत. परंतु सरकार सत्ता स्थापन करण्यात मश्गूल असतानाच काळजीवाहू मिंध्यांच्या प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर करत 2 डिसेंबर रोजी भूमिपुत्र – शेतकऱ्यांवर कारवाईचा वरवंटा फिरवला. बळजबरीने मुलाबाळांसह सर्वांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर बाधित – घरांवर बुलडोझर फिरवला. यावेळी काही जणांना कवडीमोल भरपाई देऊन वेळ मारून नेण्यात आली. पण तेथे असलेल्या बाधित कुटुंबातील लक्ष्मी परशू बरफ (47) या महिलेला भरपाई देण्यास नकार दिला. प्रांताधिकारी सत्यम गांधी यांनी ज्याच्या नावावर सातबारा आहे त्यालाच मदतीचा चेक देऊ असे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी गुजरात येथे बोटीवर असलेला कामगार पती घरी परतल्यानंतर त्याने प्रांताधिकाऱ्याकडे धाव घेत मदत मागितली. मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत परशू बरफ यांना पिटाळल्याने त्यांची पत्नी लक्ष्मी बरफ यांना हा मनस्ताप सहन झाला नाही. त्यांनी नुकसानभरपाई मिळत नसल्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे तलासरीत खळबळ उडाली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
फडणवीस न्याय देणार का?
देवेंद्र फडणवीस एकीकडे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना दुसरीकडे तलासरीतील लक्ष्मी बरफ या महिलेने नुकसानभरपाई मिळत नसल्याने मृत्यूला कवटाळले. प्रांताधिकारी सत्यम गांधी यांनी वेळीच नुकसानभरपाईचा हा धनादेश दिला असता तर त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून फडणवीस या भगिनीला न्याय देतील का, असा सवाल तलासरीतील नागरिकांनी केला
आहे.
झाडांची नुकसानभरपाई 60 रुपये
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अधिकारी अक्षरशः नुकसानभरपाईच्या नावाखाली तोंडाला पाने पुसत आहेत. नथू बरफ व अन्य शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीत वनझाडे, फळझाडे तसेच घराचे बांधकाम होते. मात्र यातील वनझाडांची नुकसानभरपाई अवघी 60 रुपये देण्यात आली आहे.