
मोखाडा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे अपूर्णावस्थेत असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे तहानलेल्या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करूनही केवळ टँकरमुक्त मोखाडा तालुका दाखवण्याचा प्रयत्न करणारे प्रशासन अखेर तोंडावर आपटले आहे. पाणीटंचाईच्या भयंकर वास्तव्याचे पुरावेच दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध करत टीकेची झोड उठवली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या निगरगट्ट अधिकाऱ्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या अनेक गावपाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जलजीवन मिशन योजनेंतर्गत ‘हर घर नलसे जल’ ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. मात्र मोखाडा तालुक्यात या योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. त्यातच मोखाड्यात विहिरींनी तळ गाठल्याने गोमघर, सायदे, पाथर्डी आणि सूर्यमाळ या ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रातील टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती. मात्र सरकारी धोरण धाब्यावर बसवून प्रशासनाने या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याची मंजुरी असताना याकडे कानाडोळा करण्यात आला.
प्रशासनाची तारांबळ उडाली
टंचाईग्रस्त गावपाड्यांतील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. या भीषण स्थितीचे वास्तव दैनिक ‘सामना’ने 24 फेब्रुवारीला ‘जलजीवनच्या योजना रखडल्या, टाहो फोडूनही पाणी मिळेना’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर त्याच दिवशी सोमवारी प्रशासनाने गोमघर, वाघवाडी, दुधगाव, सायदे जांभुळवाडी, पाथर्डी, हेदवाडी आणि सूर्यमाळमधील केवनाळे येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे येथील महिलांना दिलासा मिळाला असून त्यांनी ‘सामना’चे आभार मानले आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करा !
टँकरद्वारे पाणीपुरवठा मागणीचे प्रस्ताव येताच त्यांना तातडीने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात येते. त्यानुसार तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांचे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. मात्र टँकर मंजुरीनंतर सुमारे 15 ते 20 दिवसांनी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी तडफडत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.