पाणीपट्टी भरणारांनाच मिळणार कुकडी कालव्याचे पाणी

कुकडी कालव्याचे रब्बी आवर्तन क्रमांक दोन ते 16 फेब्रुवारी रोजी सुरू झाले असून, ‘टेल टू हेड’ या पद्धतीने आवर्तन देण्यात येणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीची पाणीपट्टी पूर्णपणे भरलेली आहे, याच शेतकऱ्यांना या आवर्तनामधून पाणी देण्यात येणार आहे. तसा आदेश जलसंपदा विभाग, पुणे यांच्या कार्यालयाने काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत सक्त सूचना पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या चारही पाटबंधारे विभागाच्या कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. यामुळे पाणीपट्टी न भरणाऱ्या शेतकऱ्यांना कुकडीचे या आवर्तनाचे पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कुकडीचे आवर्तन दरवर्षी किमान तीनवेळा सोडण्यात येते. प्रत्येक आवर्तनामध्ये शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याबाबत सूचना जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी करतात. मात्र, त्या सचनांकडे दर्लक्ष करून आवर्तन सुरू झाले की वेगवेगळ्या पद्धतीने पाणी घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. आवर्तन सुटल्यानंतर ‘पैसे नंतर भरतो’, असे सांगून अनेकवेळा वेळ मारून नेली जाते. यावेळी मात्र जलसंपदा विभागाने पाणीपट्टीबाबत सक्तीचे धोरण अवलंबल्याचे दिसन येत आहे.

कुकडी डावा कालव्याचे रब्बीसाठीचे दुसरे आवर्तन 16 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाले असून, ‘टेल टू हेड’ पद्धतीने करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. कोळवडी विभागाच्या कार्यक्षेत्रात करमाळा व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची पाणी मागणी व पाणी उपलब्धतेनुसार पाण्याचे नियोजन केल्याचे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले. मात्र, हे करताना ज्या शेतकऱ्यांकडे यापूर्वीची पाणीपट्टी थकबाकी असेल, त्यांना पाणी देण्यात येणार नसल्याचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना 15 मार्च 2025 पर्यंत थकीत पाणीपट्टी भरून शासनास सहकार्य करण्याचे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात येत आहे.

जर यापूर्वीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली नाही, अशा शेतकऱ्यांना या आवर्तनामधून पाणी देण्यात येणार नाही, असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे कुकडीचे रब्बीचे हे आवर्तन महावितरण कंपनीने बंद केलेला वीजपुरवठा यामुळे अडचणीत सापडलेले असतानाच, आता पुन्हा एकदा जलसंपदा विभागाने मागील पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरावी तरच या आवर्तनामधून पाणी देऊ, अशी भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.