Thane News – अतिरिक्त आयुक्तांनी केला लिपीक महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच दिवसेंदिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या घटना उघडकीस येत आहेत. शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सर्वच या नराधमांच्या वासनेच्या शिकार ठरत आहेत. असे असताना आता चक्क महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांनी लिपीक महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सदर प्रकार उल्हासनगर महानगर पालिकेत घडल्याचे उघडकीस आले आहे. आयुक्त पीडित महिलेला तु छान दिसतेस, तुझे कपडे खूप छान आहेत अशा पद्धतीच्या कमेंट पास करत होता. महिलेने वारंवार समज देऊन देखील आयुक्तांनी त्यांच्या स्वभावात बदल केला नाही. अखेर महिलेने पोलीस स्थानकात धाव घेत अतिरिक्त आयुक्तांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादिनंतर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे. महापालिकेत ड्रायव्हर असणाऱ्या पीडित महिलेच्या पतीचे 2010 मध्ये निधन झाले होते. त्यांच्याजागी सन 2011 पासून पीडित महिला कनिष्ठ लिपीक या पदावर अनुकंपा तत्वावर रुजू झाली होती. 2017 साली पीडित महिलेची आरोपी आयुक्तांसोबत ओळख झाली. तेव्हापासूनच संबंधित अधिकारी महिलेशी गैरवर्तन करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच महिलेने 14 ऑगस्ट 2023 रोजी महापालिकेच्या संबंधित विभागात आणि 20 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडेही आयुक्तांची तक्रार केली होती.