
मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येलाच ठाणे महापालिका प्रशासनाचा मराठी भाषेविषयीचा तिरस्कार उघड झाला आहे. मराठी भाषेतून पदव्युत्तर पदवी घेणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांचा प्रोत्साहन भत्ता रद्द करण्याचा तुघलकी फतवा प्रशासनाने काढला आहे.
आठ वर्षांपूर्वी पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी मराठीतून डीएमजीएफएम, एलएसजीडी, एम.ए. व तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता अचानक अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये मराठीतून ‘एम. ए.’ करणाऱया पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱयांच्या वेतनवाढीवर घाला घातला आहे.
सातव्या वेतन आयोगाकडे बोट
मराठीतून पदव्युत्तर पदवी घेणाऱया कर्मचाऱयांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे हा ठराव रद्द करायचा झाल्यास प्रशासनाला पुन्हा महासभेपुढे जावे लागणार आहे. मात्र महासभा अस्तित्वात नसल्याने प्रशासनाने परस्पर निर्णय घेऊन अतिरिक्त वेतनवाढ रोखल्याचे परिपत्रक काढले आहे.