ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची न्यायासाठी फरफट; हल्लेखोर सावत्र भावावर कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ

मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजनेचा संपूर्ण राज्यात मोठा गाजावाजा सुरू असतानाच ठाण्यातील लाडक्या बहिणीची मात्र न्यायासाठी फरफट सुरू आहे. वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या प्रांजली दळवी यांच्यावर त्यांचा सावत्र भाऊ आणि भाच्याने हल्ला केला. यात प्रांजली यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मात्र हल्लेखोर हे मिंधे गटाच्या जवळचे असल्यामुळे नौपाडा पोलिसांनी सुरुवातीला गुन्हाच दाखल केला नाही. आता गुन्हा दाखल झाला असला तरी पोलीस हल्लेखोरांना वाचवण्यासाठी जिवाचा अटापिटा करीत आहेत. त्यामुळे प्रांजली यांची न्यायासाठी फरफट सुरू आहे.

वागळे इस्टेट येथील गुरुकृपा इमारतीत राहणाऱ्या प्रांजली दळवी यांच्या वडिलांची नेरळ येथे जागा होती. ही जागा त्यांचा सावत्र भाऊ रमेश जाधव यांनी विकली. या व्यवहारातून प्रांजली यांना अकरा लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्या रकमेचा धनादेशही त्यांना देण्यात आला होता. मात्र धनादेश बँकेत टाकू नको मी तुला रोख रक्कम देतो, असे रमेश जाधव यांनी त्यांना सांगितले. मात्र पुढे ती रक्कमही देण्यास टाळाटाळ करू लागले.

आपले पैसे मागण्यासाठी प्रांजली या तलावपाळी येथील रुपश्री इमारतीत राहाणाऱ्या भावाकडे गेल्या असता जाधव आणि त्यांचा पुत्र निशांत जाधव यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात प्रांजली यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्या नौपाडा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी त्यांचे काहीएक ऐकूण घेतले नाही. त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला.

माझ्या हाताचे हाड मोडल्यामुळे मला प्रचंड वेदना होत होत्या. मला रुग्णालयात जाऊ द्या, अशी विनंती मी पोलिसांना केली. मात्र पोलिसांनी मला तब्बल साडेतीन तास बसवून ठेवले. एन. सी. घेऊन घरी जाण्यास सांगितले. नंतर मी सिव्हिल रुग्णालयात जाऊन उपचार घेतले, असेही प्रांजली दळवी म्हणाल्या.

तक्रार घेण्याऐवजी दमदाटी

माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी सकाळी साडेअकरा वाजता नौपाडा पोलीस ठाण्यात गेले. माझ्या हाताचे हाड मोडल्यामुळे हात सुजला होता आणि मला प्रचंड त्रास होत होता. मात्र पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रणभिसे यांनी माझे काहीएक ऐकून घेतले नाही. उलट मला दमदाटी केली. त्यावेळी मिंधे गटाचे काही पदाधिकारी त्यांच्याकडे जाधव यांच्यावर कारवाई करू नका असे सांगण्यासाठी आले होते. दुपारी तीन वाजता पोलिसांनी मला वैद्यकीय तपासणीसाठी पत्र दिले. मात्र जाधव पितापुत्रांवर गुन्हा दाखल केला नाही. आता गुन्हा दाखल झाला असला पोलीस त्यांना अटक न करता मदत करीत आहेत, असा आरोप प्रांजली दळवी यांनी केला आहे.