चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या मिंधे गटाच्या ठाण्यातील उपविभागप्रमुख सचिन यादव याला तत्काळ अटक करावी यासाठी आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. बदलापुरात एक न्याय आणि ठाण्याला वेगळा न्याय चालणार नाही असे खडेबोल सुनावतानाच बहिणीला अनुदान आणि बालिकांवर अत्याचार.. हाच का तुमचा न्याय, असा संतप्त सवाल ठाणेकरांनी मिंध्यांना केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, भाजप, मनसेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत महिला व बालिकांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात आक्रोश केला.
ठाणे शहरातील भंडार आळी परिसरात राहणारा मिंधे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव याने 11 ऑक्टोबर रोजी एका अकरा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केला होता. याबाबत मुलीने घरी जाऊन घडलेला प्रकार सांगताच पीडितेच्या आई-वडिलांनी ठाणे नगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मात्र यादव हा मिंधे गटाचा पदाधिकारी असल्याने पोलिसांनी थातूरमातूर कलमे लावून कारवाईचा फार्स केला. राजकीय दबावामुळे कारवाई केली जात नसल्याने अखेर आज हजारो ठाणेकर रस्त्यावर उतरले. स्टेशन परिसरातील मुख्य बाजारपेठेतून भंडार आळी मार्गे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेल्या हजारो मोर्चेकऱयांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. त्यावेळी मिंध्यांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक अॅड. आकांक्षा राणे, विद्या कदम, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, संगीता साळवी, कांता पाटील, सुप्रिया गावकर, सुनंदा देशपांडे, रजनी बंका, सविता धुमाळ, उज्ज्वला पवार, सचिन चव्हाण, संजय भोई, राकेश जाधव, आनंद मानकामे, वरूण मानकामे, अजय पवार, लिपीन गेहलोत आदी उपस्थित होते.
थोरांचा वारसा सांगता.. हे तुम्हाला शोभतं का?
उत्स्फूर्तपणे निघालेल्या या आंदोलनात ठाणेकरांनी मिंधे गटावर अक्षरशः हल्लाबोल केला. यावेळी मोर्चेकऱयांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. थोरांचा वारसा सांगता.. आणि बाल गुन्हेगारीला प्रोत्साहन देता.. हे तुम्हाला शोभतं का?, बालकांवरील अन्याय सहन करणार नाही, आरोपीला कडक शासन झालेच पाहिजे, सत्तेच्या जोरावर अन्यायाचा वरवंटा फिरवाल तर खबरदार, असा इशाराच आंदोलकांनी मिंधे सरकारला दिला.
कसाऱयातही मिंधे गटाच्या पदाधिकाऱयाविरोधात पोस्को
मिंधे गटाच्या कसाऱयातील विकृत शहरप्रमुखाचाही कारनामा समोर आला आहे. एका 17 वर्षीय मुलीची छेड काढतानाच तिच्या बहिणींनाही मारहाण केली आहे. याप्रकरणी कसारा पोलिसांनी लक्ष्मण ढगळे याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी व तिच्या वडिलांचे कसारा बाजारपेठेत किरकोळ भांडण झाले होते. मात्र हा वाद मिटल्यानंतर दोघेही घरी परतले. त्यानंतर सायंकाळी लक्ष्मण ढगळे हा पाच ते सहा साथीदारांसह पीडितेच्या घरी गेला. त्यावेळी त्याने घरी कुणी नसल्याचा फायदा घेत पीडितेचा विनयभंग केला. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या अन्य बहिणी पीडितेच्या मदतीला धावून आल्या. त्यावेळी ढगळेच्या साथीदारांनी या मुलींना मारहाण केल्याची तक्रार कसारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.