तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची 10 ते 12 जुलैला पायाभूत चाचणी, प्रथम, तृतीय भाषा, गणित विषयाची परीक्षा होणार

 तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची 10 ते 12 जुलैला पायाभूत चाचणी होणार आहे. स्टार्स प्रकल्पाअंतर्गत या शैक्षणिक वर्षात तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यांकन चाचणी 1 आणि संकलित मूल्यांकन चाचणी 2 घेण्यात येणार आहे. त्यातील पायाभूत चाचणी जुलैमध्ये होणार आहे.

लेखी आणि तोंडी पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांची 40 गुणांची, पाचवी ते सहावीची 50 तर सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची 60 गुणांची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा सर्व सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची घेण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्या-त्या इयतेची संपादणूक प्राप्त केली आहे का हे तपासण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

पायाभूत चाचणी 10 ते 12 जुलैदरम्यान, तर संकलित मूल्यांकन चाचणी-1 ही ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. तर संकलित मूल्यांकन चाचणी 2 ही परीक्षा एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात घेण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिल्या आहेत. ही परीक्षा एकूण 10 माध्यमांत होणार असून मागील इयतेच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे.

प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्सचे पैसे मिळणार नाहीत

शिक्षणाधिकाऱयांकडून मिळालेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळांना वितरित करण्यात येणार आहेत. मात्र तरीही प्रश्नपत्रिका कमी पडल्यास अथवा त्यांची झेरॉक्स काढावी लागल्यास त्यासाठी सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांची असणार आहे.