जगभरातून महत्वाच्या बातम्या

टेस्लाच्या सायबर ट्रकची युद्धात एण्ट्री

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने आता नवे वळण घेतले आहे. अमेरिका युक्रेनला रशियाविरुद्ध शस्त्रास्त्रs पुरवत असताना टेस्ला या कंपनीचा सायबर ट्रकचा वापर युक्रेनविरोधात वापरला जात आहे. टेस्लाच्या महागडय़ा वाहनाचा युद्धात वापर होत असल्याने टेस्लाचा सर्वेसर्वा एलन मस्कसुद्धा बुचकळ्यात पडला आहे. चेचेन्या या दहशतवादी गटाचा नेता रमजान कादिरोवने या वाहनाचा धक्कादायक खुलासा केला आहे.

कतार एअरलाइन्सची पेजरवॉकीटॉकीवर बंदी

कतार एअरलाइन्स विमान कंपनीने लेबनॉनच्या बेरूत रफिक हारिरल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून उड्डाण करणाऱया सर्व प्रवाशांना विमानात पेजर आणि वॉकीटॉकी घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. यासंबंधीची सूचना एअर कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही बंदी असणार आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. लेबनॉनमध्ये वॉकीटॉकी आणि पेजर हल्ल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे.

फेस्टिव सीजन आधी ड्रायफ्रूट्स महागले

भाजीपाल्याच्या किंमतीत भरमसाट वाढ झाल्यानंतर आता काजू, बदाम, अखरोटच्या किंमतीत वाढ झाली आहे. फेस्टिव्ह सीजनआधीच मिठाईंच्या किमतीतसुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ईराण, दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांतून ड्राय फ्रूट्स आयात केली जाते. बदाम, पिस्ता, काजू, अखरोटची मागणी वाढल्याने किंमतीत वाढ झाल्याचे एका व्यापाऱयाने सांगितले.

श्रीलंकेत आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान

श्रीलंकेत उद्या, शनिवारी राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवरच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अनुरा पुमारा दिसानायके, विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा, विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे हेही या शर्यतीत आहेत.

सिंगापूरमध्ये हिंदुस्थानी नागरिकाला 25 हजारांचा दंड

मूळचा हिंदुस्थानी असलेल्या एका नागरिकाला सिंगापूरमधील शॉपिंग मॉलच्या गेटसमोर शौच करणे चांगलेच महागात पडले. या व्यक्तीला 400 सिंगापूर डॉलर म्हणजेच जवळपास 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रामू चिन्नारसा (37) याने सिंगापूरच्या मरिना बे सँड्स येथील द शॉप्स मॉलच्या गेटवर शौच केली होती.