बुर्किना फासोमध्ये नरसंहार, दहशतवाद्यांनी 600 नागरिकांना ठार मारले; मृतांमध्ये महिला-लहान मुलांचा समावेश

फ्रान्सच्या गुप्तचर संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला. या अहवालातून बुर्किना फासोमधील नरसंहार उघडकीस आला आहे. अल कायद्याशी संबंधित दहशतवाद्यांनी बुर्किना फासोमध्ये 24 ऑगस्ट रोजी काही तासांतच सुमारे 600 नागरिकांना ठार केले. मृतांमध्ये महिला आणि बालकांचा अधिक समावेश आहे.

पश्चिम आफ्रिकन देशाच्या इतिहासातील सर्वात धोकादायक हल्ल्यापैकी एक असे या हल्ल्याचे वर्णन केले जात आहे. बुर्किना फासो सध्या अल कायदा आणि इस्लामिक स्टेट गटाशी संबंधित दहशतवादी चळवळीशी लढत आहे.

बुर्किना फासोमध्ये सक्रिय असलेल्या अल कायद्याशी संबंधित दहशतवाद्यांनी बाईकवरून बारसालोघोच्या बाहेरील भागात प्रवेश करत गावकऱ्यांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी जवळपास 200 नागरिकांना मारल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राने व्यक्त केला होता. तर दहशतवाद्यांच्या गटाने दिलेल्या निवेदनात 300 फायटर मारल्याचे म्हटले आहे. तथापि, फ्रान्स सरकारच्या सुरक्षा मूल्यांकनाचा हवाला देत सीएनएनने या हल्ल्यात सुमारे 600 लोक मारले गेल्याचे वृत्त दिले आहे.

दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ समोर

दहशतवादी मोटारसायकलवरून बारसालोघोच्या हद्दीत घुसले आणि त्यांनी आपल्या शहराच्या रक्षणासाठी खंदक खोदणाऱ्या गावकऱ्यांवर गोळ्या झाडल्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक गावकरी खाली झोपलेले दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी गावकरी मरण्याचे नाटक करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

माली, बुर्किना फासो आणि नायजरमध्ये सततच्या सत्तापालटांमुळे फ्रेंच आणि अमेरिकन सैन्याला तेथून माघार घ्यावी लागली. या देशांमध्ये कायमस्वरूपी सरकार नाही. अशा परिस्थितीत जिहादी गटांना फोफावण्याची संधी मिळाली आहे. बुर्किना फासोमध्ये जिहादी बंडखोरी 2015 मध्ये सुरू झाली.