जम्मू-कश्मीरात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, मोदींच्या मस्त परदेशवाऱ्या चालल्यात…

army-convoy-J&K

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये धुमश्चक्री सुरूच असून आज कठुआ जिह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले. लोही मल्हार ब्लॉकच्या मचहेडी येथील बडनोटा गावात हा हल्ला झाला.

मचहेडीत दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरूच असून जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये भयंकर स्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र रशियात पुतिन यांच्याकडून पाहुणचार करून घेण्यात व्यस्त आहेत. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

पोलीस आणि सुरक्षा दल पथकांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांची शोधमोहीम राबवली. ऑपरेशन सुरू असतानाच दहशतवाद्यांनी अचानक जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी अचानक अंधाधुंद गोळीबार सुरु केला. हा परिसर हिंदुस्थानी लष्कराच्या 9 कोरच्या अखत्यारित येतो. या परिसरात दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा दलाच्या आणखी तुकडय़ा पाठवण्यात आल्या. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला होता. याआधी 4 मे रोजी पुँछ जिह्यातील शाहसितार परिसरात हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात विक्की पहाडे हा जवान शहीद झाला होता तर आणखी 4 जवान जखमी झाले होते.

सैन्यदलावर दोन दिवसांत दुसरा हल्ला

सैन्यदलाच्या तळावर गेल्या दोन दिवसात दहशतवाद्यांनी दुसऱयांदा हल्ला केला आहे. 7 जुलै रोजी सकाळी दहशतवाद्यांनी राजौरी जिह्यातील मंजाकोट परिसरात लष्कराच्या तळावर हल्ला केला होता. यात एक जवान जखमी झाला होता. जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे दहशतवादी घनदाट जंगलात पळून गेले होते. दरम्यान, लष्कर आणि पोलिसांकडून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे.

याआधीही झाले लष्कराच्या ताफ्यावर हल्ले

12 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

सुरनकोटमध्ये 21 डिसेंबर रोजी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात 5 जवान शहीद झाले होते. 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी स्टीलच्या बुलेटचा वाहनावर वर्षाव केला होता. त्यामुळे या गोळ्या लोखंडी वाहनांतून आरपार जाऊन जवानांना लागल्या होत्या. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. दहशतवाद्यांनी एम-4 रायफलचा वापर केला होता.