जम्मू-कश्मीरात भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 ठार, 33 जखमी

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच आज जम्मू-कश्मीरमध्ये भयंकर दहशतवादी हल्ला करण्यात आला. वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून बस दरीत कोसळली. त्यात 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह 33 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

राजौरी आणि पुँछ जिह्याच्या तुलने रियासी जिह्यात मोठय़ा प्रमाणावर दहशतवादी कारवाया होताना दिसत नाहीत. मात्र, आज मोदींचा शपथविधी सुरु असतानाच रियासी जिह्यातच दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडल्याने याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

मतदानादरम्यान हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला

देशभरात मतदान सुरु असताना जम्मू कश्मीरच्या पुँछ जिह्यात 4 मे रोजी हवाईदलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात एक जवान शहीद झाला. हल्ल्यात पाच जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना एयरलिफ्ट करून उधमपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचादारम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. एकीकडे हल्ले होत असताना पंतप्रधान प्रचारात मश्गुल असल्याची टीका या हल्ल्यानंतर चोहोबाजूंनी झाली होती. सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी पुँछ, राजौरी, अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले होते.

हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही -अमित शाह

भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे अत्यंत दुःख झाले. हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना हिंदुस्थानातील कायदाच कठोरातील कठोर शिक्षा करेल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्थानिक प्रशासन घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच इश्वरचरणी प्रार्थना असेही त्यांनी म्हटले आहे.

जम्मू कश्मीरातील सुरक्षेचा हाच खरा चेहरा -राहुल गांधी

दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला ही अत्यंत दुःखद घटना आहे. जम्मू कश्मीरमधील अतिशय चिंताजनक सुरक्षा व्यवस्थेचा हाच खरा चेहरा असल्याचे या हल्ल्यामुळे उघड झाले आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा एक्सद्वारे निशाणा साधला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना असून जखमी झालेल्या भाविकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल अशी आशा आहे. दहशतवादाविरोधात संपुर्ण देश एकजुटीने उभा आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

एनडीएचा शांतता प्रचार खोटा -मल्लिकार्जुन खरगे

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेताना आणि विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी त्यावेळी हजर असताना श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला होतो. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. एनडीएने जम्मू-कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा प्रचार केला होता. हा शांतता प्रचार अत्यंत खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. अशी तोफ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी डागली आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आणि जखमी झालेल्यांना तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणीही केली आहे.

दहशतवाद पुन्हा परतला -ओमर अब्दुल्ला

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या भ्याड हल्ल्याची निंदा करतानाच ज्या भागातून दहशतवाद पूर्णपणे हटवण्यात आला होता त्या भागात दहशतवाद पुन्हा परतला आहे, अशा शब्दांत ओमर अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केला आहे.

मोदीजी कश्मिरी पंडितांची घरवापसी कधी -संजय राऊत

पूर्वी दहशतवादी हल्ले कश्मीर खोऱ्यात होत होते. मात्र, 370 कलम हटवल्यानंतर दहशतवादी हल्ले जम्मूमध्येही होऊ लागले. आज हल्ला झाला. मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी खुनी खेळ खेळत होते. अशा हल्ल्यांमुळे कश्मिरी पंडित आजही त्यांच्या घरी परतू शकत नाहीत. मोदीजी या पंडितांची घरवापसी होणार कधी. अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

अंदाधुंद गोळीबार बस दरीत कोसळली

रियासी जिह्यातील पोनी परिसरातील तिरयाथ गावाजवळ हा हल्ला झाला आहे. पोलिसांची अतिरीक्त कुमक, लष्कर, निमलष्करी दलाचे जवान बचावकार्यासाठी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरुच होते. ही बस भाविकांना घेऊन शिव खोडी मंदीर येथून कटरा येथे माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी  जात होती, अशी माहिती पोलिस अधिक्षक मोहीत शर्मा यांनी दिली. बसमध्ये 53 प्रवासी होते.