नालासोपाऱ्यात दहा वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना अटक

बदलापूर घटनेनंतर देश हादरला असताना नालासोपारा येथे दहा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच नालासोपारा पूर्वेला एका 17 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना एकापाठोपाठ एक घडत असल्याने महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या शिर्डीनगर परिसरात ही दहा वर्षांची पीडित मुलगी कुटुंबासोबत राहते. 2 सप्टेंबर रोजी परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी ती गेली होती. तिथून घरी परतत असताना घराच्या जवळील परिसरात दोन अनोळखींनी तिला रस्त्यात अडवले आणि तिला ओढत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या घटनेनंतर या पीडित मुलीची ढासळलेली मानसिक स्थिती आणि तिला होत असलेल्या वेदनांमुळे तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची शंका तिच्या आई-वडिलांना आली. त्यांनी खोदून विचारल्यानंतर पीडित मुलीने घडलेली घटना घरच्यांना सांगितली. त्यानंतर  तिच्या आईने आचोळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे.