
महाराष्ट्रात सर्व शाळा आणि सर्व बोर्डांमध्ये मराठी भाषा सक्तीची आहे. असे असले तरीही अनेक बोर्डाच्या शाळांमध्ये हा विषय पर्याय म्हणून शिकवला जातो. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी हा विषय सक्तीचा करण्याची मागणी केली जात असतानाच तेलंगणामध्ये सर्व शाळांना तेलुगू भाषा सक्तीची केली आहे. शासन निर्णय काढून सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी म्हणजेच इंटरनॅशनल बॅकलॅरिएट यांसह सर्व बोर्डांशी संलग्न शाळांना हा निर्णय लागू असणार आहे.
तेलंगणा सरकारचा हा नवीन आदेश शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आदेश शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू होईल. हे निर्णय 2018 पासून प्रलंबित आहेत. आता सरकारने हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदी भाषा लादली नाही तर विरोध करणार नाही – स्टॅलिन
जर तामीळनाडू आणि तामिळींचा आत्मसन्मानाशी खेळ न करता हिंदी भाषा आमच्यावर लादली नाही तर आम्ही हिंदी भाषेला विरोध करणार नाही, हिंदी बोर्डावर काळे फासणार नाही, अशी भूमिका तामीळनाडूचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज जाहीर केली. राज्यावर केंद्र सरकारकडून हिंदी भाषा लादली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्यावर हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. तर हा आरोप भाजपच्या नेत्यांनी फेटाळला आहे.