T20 World Cup 2024 … दिल अभी भरा नही!

>>विठ्ठल देवकाते
तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘टीम इंडिया’ने टी-20 क्रिकेटचं जगज्जेतेपद जिंकलं अन् हिंदुस्थानी क्रिकेटवेडे रस्त्यावर उतरून विजयोत्सव साजरा करत होते. इतक्यात आधी विराट कोहली अन् नंतर लगेच रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली अन् चाहत्यांच्या आनंदात मिठाचा खडा पडला. गेले दीड दशक टी-20 क्रिकेटमध्ये रंगलेली तुमची मैफल चाहते तल्लीन होऊन ऐकत असतानाच अचानक संपली. या जोडीने विक्रमांचे इमले रचून एव्हरेस्टहून मोठी उंची तर गाठलीच, पण ‘टीम इंडिया’लाही नव्या उंचीवर नेलं. त्यामुळे हिंदुस्थानचे हे महारथी फलंदाज आणि आजी-माजी कर्णधार आता टी-20 क्रिकेटमध्ये दिसणार नाहीत म्हटल्यावर ‘अभी ना जाओ छोड के, की दिल अभी भरा नही’, अशीच अवस्था सध्या क्रिकेटप्रेमींची झालीय.

रोहित-विराट आता तुम्ही ऐका.. तुम्ही दोघे टी-20 क्रिकेटमध्ये नाही म्हटल्यावर क्रिकेटप्रेमींचा उत्साह नवीन वाघ-सिंहाची जोडी तयार होईपर्यंत मावळणार… मैदानावरील क्रिकेटप्रेमींची संख्याही रोडावणार… तुमच्यासारखे स्टार फलंदाज नाही म्हटल्यावर बाद करायला प्रतिस्पर्धी गोलंदाजांमध्ये स्पर्धा नाही रंगणार… दुसरं कोणी 90 च्या फेऱयात असताना त्यांच्या शतकासाठी क्रिकेटप्रेमींचे श्वास नाही रोखणार… तुम्ही दोघं नाही म्हटल्यावर हिंदुस्थानची मॅच असताना रस्ते ओस नाही पडणार… हीच आणि हीच चर्चा सध्या हिंदुस्थानी क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

रोहित-विराट, तुमच्या जोडीने मुंबईपासून मेलबर्न, न्यूयॉर्कपासून लॉर्डस्, दिल्लीपासून दरबान, कोलंबोपासून वेलिंग्टन, शारजापासून बार्बाडोस, हरारेपासून ढाका अशी क्रिकेटच्या दुनियेतील सगळी मैदानं आपल्या बॅटनं गाजविली आहेत. एकाने 2007 ला, तर दुसऱयाने 2010 ला टी-20 क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. एकाचं वय आहे 37, तर दुसऱयाचं 36 वर्षे. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीला व आत्मविश्वासाला कर्तृत्वाची जोड दिल्यानंतरच तुम्हा दोघांना क्रिकेटजगतात आदराचं स्थान मिळालं. आपल्या बॅटच्या जोरावर क्रिकेटमध्ये स्वतःचं वेगळं साम्राज्य उभं करू पाहता पाहता तुम्ही जगातील ऐतिहासिक व्यक्तींच्या पंक्तीत जाऊन बसलाय! सारंच कसं जणू स्वप्नवतच!

क्रिकेटविश्वातील तुम्ही दोघेही महान खेळाडू, पण दोघांचा खेळ अन् स्वभाव भिन्न. रोहित, तू विराटसारखा खेळत नाही, त्याच्यासारख्या उडय़ा मारत नाही. तू आपल्या मर्यादा ओळखून आहेस, मात्र मर्यादेत राहूनही तू सर्वोत्तम आहेस. विराट, तुझ्या नसानसात आक्रमता ठासून भरलेली आहे. स्वभावाप्रमाणे तुझं क्रिकेटही आक्रमक. त्यामुळेच तुला ‘टीम इंडिया’चं ‘रनमशीन’ म्हणतात. देखणं व्यक्तिमत्त्व अन् मैदानावरील लक्षवेधी देहबोलीमुळे इतर क्रिकेटपटूंपेक्षा तुझे चाहते कितीतरी पटीने अधिक आहेत.

रोहित-विराट, तुम्ही दोघांनी देशासाठी 45 हजारांहून अधिक धावांची लयलूट केलेली आहे. दोघांच्याही नावावर दोन-दोन वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद जमा आहे. दोघेही देशाची शान आहात. तुमच्या दोघांच्या नुसत्या उपस्थितीनेही संघावर प्रभाव पडतोय. दोघांचा खेळण्याचा ढंग वेगळाय, रंग वेगळाय, अंदाज वेगळाय. मात्र तुम्ही दोघेही मॅचविनर क्रिकेटर आहात, हेच तुमच्यातील एकमेव साम्य होय. फिटनेस, दुखापत, बॅडपॅच असे अनेक अडथळे इतरांप्रमाणेच तुमच्याही वाटय़ाला आले, मात्र यामुळे तुम्ही कधी खचला नाहीत. यशाच्या शिखरावर असताना कधी उतला नाहीत, मातला नाहीत, घेतलेला वसा कधी टाकला नाहीत. म्हणूनच तुमची गेले दीड दशक रंगलेली क्रिकेटची कारकीर्द सुफळ संपूर्ण झाली. तुमच्या टी-20 क्रिकेटमधील कर्तृत्वाला सलाम अन् कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमधील राहिलेल्या इनिंगला आमच्या भरभरून शुभेच्छा!!