रविंद्र जाडेजाही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त

टीम इंडियाने शनिवारी रात्री सातासमुद्रापार वेस्ट इंडीजमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवित टी-20 वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर लगेच विराट कोहली व नंतर रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला. आपल्या जीवाभावाच्या दोन संघ सहकाऱयांनी टी-20 क्रिकेटला गुडबाय केल्याने विचलित झालेला अष्टपैलू रवींद्र जाडेजानेही रविवारी (दि. 30) सोशल मीडियावर पोस्ट टाकून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

जाडेजाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटची इनिंग संपविली. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘सर्वांचे मनापासून आभार मानत मी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला गुडबाय करत आहे. देशासाठी प्रतिनिधित्व करताना मी मैदानावर नेहमीच जिवाचे रान केलेले आहे. क्रिकेटच्या इतर प्रकारातही मी यापुढेही देशासाठी अशीच कामगिरी करत राहीन. टी-20 क्रिकेटच्या जगज्जेतेपदावर नाव कोरण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याने साहजिकच आनंद झालाय. आमच्या टी-20 क्रिकेट कारकीर्दीचे हे शिखर होय. आतापर्यंत दिलेल्या समर्थनाबद्दल सर्वांना धन्यवाद. जय हिंद.’

अमेरिका व वेस्ट इंडीज यांच्या संयुक्त यजमानीत झालेल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये रवींद्र जाडेजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने या स्पर्धेत आठ सामने खेळताना केवळ 35 धावा केल्या, तर त्याला केवळ एकच बळी मिळाला.

जाडेजाची आंतरराष्ट्रीय टी-20 कारकीर्द
रवींद्र जाडेजाने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. हिंदुस्थानसाठी त्याने एकूण 74 टी-20 सामने खेळले. या स्टार अष्टपैलू खेळाडूने 127.16 च्या स्ट्राईक रेटने 515 धावा केला, तर 54 विकेट घेतल्या. याचबरोबर या डावखुऱया खेळाडूने वर्ल्ड कपमध्ये 2009 ते 2024 पर्यंत देशाचे प्रतिनिधित्व केले. जाडेजाच्या नावावर 30 वर्ल्ड कपचे सामने आहेत. या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत त्याने 130 धावा केल्या असून 22 विकेटही टिपल्या आहेत. आशिया चषक स्पर्धेतही जाडेजाने सहा सामने खेळले असून दोन डावांत 35 धावा, तर 4 फलंदाज बाद केले आहेत.