आता ‘टीम इंडिया’ खतरे में ! डब्ल्यूटीसीमधील रोहित सेनेची वाट बिकट; एक कसोटी हरली तरी पाय खोलात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावसकर करंडकात पर्थमध्ये रुबाबदार विजयासह सुरुवात करणाऱ्या ‘टीम इंडिया’ला ऍडलेडमधील दुसऱ्या कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवाने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) क्रिकेट स्पर्धेतील हिंदुस्थानची वाट बिकट झालीय. हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी 3 कसोटी सामने खेळायचे आहेत. यातील एक कसोटी सामना हरला, तरी रोहित शर्माच्या ‘टीम इंडिया’चा पाय खोलात जाणार असून, त्यांना इतर संघांमधील जर-तरच्या समीकरणावर अवलंबून राहावे लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने गणित बिघडविले

यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पाहुण्या श्रीलंकेचा 109 धावांनी पराभव करून दोन सामन्यांची मालिका 2-0 फरकाने खिशात घातली. श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 348 धावांचे लक्ष्य होते; पण त्यांचा संपूर्ण संघ सामन्याच्या पाचव्या दिवशी (9 डिसेंबर) दुसऱ्या डावात 238 धावांत गडगडला. या दणदणीत विजयानंतर दक्षिण आफ्रिकेला जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत मोठा फायदा झाला आहे. आफ्रिकन संघ आता ‘डब्ल्यूटीसी’च्या गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आला आहे.

दक्षिण आफ्रिकेचे 10 सामन्यांत 6 विजय, 3 पराभव आणि एक बरोबरीसह 76 गुणांची कमाई केली आहे. दक्षिण आफ्रिकेची गुणांची टक्केवारी 63.33 असून, ती ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर घसरलाय. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे 14 सामन्यांत 9 विजय, 4 पराभव आणि एका बरोबरीसह 102 गुण झाले आहेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी 60.71 आहे. याचबरोबर तिसऱ्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानचे 16 सामन्यांत 9 विजय, 6 पराभव आणि एका बरोबरीसह 110 गुण झाले आहेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी 57.29 इतकी आहे. हिंदुस्थानला आणखी 3 कसोटी सामने खेळायचे असून, ते सर्व ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत.

आता हिंदुस्थानची मदार जर-तरच्या समीकरणावर

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील निर्भेळ यशानंतर दक्षिण आप्रिकेचा अंतिम फेरीचा मार्ग आता सोपा झाला आहे. कारण आता या संघाला मायदेशात पाकिस्तानविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आफ्रिकन संघाने या मालिकेत एक सामना जिंकला तर ते ‘डब्लूटीसी’च्या फायनलमध्ये पोहोचतील. मात्र, दुसरीकडे हिंदुस्थानी संघाचे हे समीकरण अधिक कठीण झाले आहे.

अंतिम फेरी गाठण्यासाठी हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 4-1 फरकाने जिंकावी लागणार आहे. म्हणजेच उर्वरित तीन सामने जिंकल्यास ‘टीम इंडिया’च्या खात्यात 63.15 टक्के गुण जमा होतील. मात्र, हिंदुस्थानी संघ एकही कसोटी हरला तरी गुणांची टक्केवारी 57.89 इतकी कमी होईल. अशा स्थितीत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव करावा यासाठी हिंदुस्थानी संघाला देवाचा धावा करावा लागेल. श्रीलंकेला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला 2-0 किंवा 1-0 ने पराभूत करणे आवश्यक आहे; अन्यथा दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्या तरच ‘टीम इंडिया’चे आव्हान शाबूत राहणार आहे.

श्रीलंकेचे आव्हान जवळपास संपुष्टात

या पराभवानंतरही श्रीलंकेचा संघ चौथ्या क्रमांकावर असला तरी त्यांची ‘डब्लूटीसी’च्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. श्रीलंकेकडे 45.45 टक्के गुण आहेत आणि ते कमाल 53.85 टक्के गुणांपर्यंत पोहोचू शकतात. इंग्लंड पाचव्या, तर न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सातव्या, बांगलादेश आठव्या आणि वेस्ट इंडीज नवव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज हे संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून ‘आऊट’ झाले आहेत.