11 वर्ष अपराजीत! घरच्या मैदानावर टीम इंडियाच किंग, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम करणारा एकमेव संघ

टीम इंडियाने कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात कानपुरमध्ये बांगलादेशचा पराभव करत मालिका खिशात घातली. याचबरोबर टीम इंडियाचा हा ऐतिहासिक मालिका विजय ठरला आहे. कारण हिंदुस्थानचा संघ घरच्या मैदानावर मागील 11 वर्षांमध्ये एकदाही मालिका हरलेला नाही.

हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यामध्ये पार पडलेली दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने जिंकली आहे. कानपुरमध्ये शेवटच्या दिवशी टीम इंडियाला 95 धावांच आव्हान बांगलादेशने दिले होते. टीम इंडियाने 3 गड्यांच्या मोबदल्यात आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना आणि मालिका सुद्धा जिंकली. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग 18 वा मालिका विजय ठरला आहे. दुसरिकडे बांगलादेशचा संघ आजपर्यंत एकदाही हिंदुस्थानात मालिका जिंकू शकलेला नाही.

टीम इंडियाने घरच्या मैदानावर जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत आपला दरारा कायम ठेवला आहे. फेब्रुवारी 2013 पासून आजपर्यंत टीम इंडियाने घरच्या मैदानावर खेळताना एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. हिंदुस्थानात पार पडलेल्या 18 कसोटी मालिकांमध्ये टीम इंडिया अपराजित राहिली आहे. बांगलादेशला धुळ चारत टीम इंडियाने आपला 18 वा मालिका विजय साजरा केला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया असा एकमेव संघ आहे ज्यांनी घरच्या मैदानाव सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. याबाबतीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी सलग 10 कसोटी मालिका घरच्या मैदानावर जिंकल्या होत्या. मात्र, सलग दोन वेळा घरच्या मैदानावर 10 कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा 1994 ते नोव्हेंबर 2000 पर्यंत 10 कसोटी मालिका जिंकल्या, तर दुसऱ्यांदा 2004 ते नोव्हेंबर 2008 च्या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली होती.