जीत गया ना! हिंदुस्थान दहा वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत

जगज्जेत्या इंग्लंडचा उडवला 68 धावांनी धुव्वा

ऑस्ट्रेलियाचा वचपा काढल्यानंतर हिंदुस्थानने 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवाचे उट्टे फेडताना इंग्लंडचा उपांत्य सामन्यात 68 धावांनी धुव्वा उडवला आणि तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली.

पावसाच्या व्यत्ययामुळे तासभर उशिरा सुरू झालेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे थंड पडलेल्या खेळपट्टीवर चेंडू आपली करामत दाखवणार, हे निश्चित होते, पण विराट कोहलीचा त्रिफळा उडला तेव्हा काळजात धस्स झाले. ऋषभ पंतही लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजीचा कणा असलेल्या रोहित शर्माची सुस्साट आणि अफाट फलंदाजी, त्याला सूर्यकुमार यादवची लाभलेली साथ त्यामुळे हिंदुस्थानने गोलंदाजीला भेदक करणाऱया खेळपट्टीवर 7 बाद 171 अशी मजल मारत अर्धी लढाई जिंकली. रोहित-सूर्याने तिसऱया विकेटसाठी 73 धावांची भागी केली तेव्हा हिंदुस्थान 200 चाही टप्पा गाठेल, असा विश्वास होता, पण ही जोडी फुटताच धावसंख्या काहीशी मंदावली. तरीही हार्दिक पंडय़ा (23) आणि रवींद्र जाडेजाच्या (नाबाद 17) फटक्यांनी संघाला 171 ही मजल मारून

कुलदीपच्या फिरकीने मधली फळी कापली
मग कुलदीपच्या फिरकीने इंग्लंडच्या मधल्या फळीला धडाधड कापून काढत हिंदुस्थानचा अंतिम फेरी प्रवेश निश्चित केला. कुलदीपने आपल्या फिरकीची कमाल कायम राखताना या सामन्यातही 19 धावांत 3 विकेट टिपले तर 23 धावांत इंग्लंडच्या 3 आघाडीवीरांना बाद करणारा अक्षर विजयाचा शिल्पकार ठरला. बुमरानेही 2 विकेट घेत आपल्या गोलंदाजीची दहशत कायम राखली.

पहिला चेंडूचा विकेटचाच
हिंदुस्थानी फलंदाजीच्या वेळी आदिल राशीदचे चेंडू पाहून आपले फिरकीवीर इंग्लंडचे काम तमाम करणार, याची खात्री होती आणि झालेही तसे. अक्षर पटेलच्या पहिल्याच चेंडूंवर फसलेला कर्णधार जोस बटलर पाहिल्यावर ते प्रत्यक्षात उतरणार हे स्पष्ट झाले. बटलरनंतर त्याचा जोडीदार फिल सॉल्टची विकेट बुमराने उडवली. मग अक्षरने आपल्या दुसऱया आणि तिसऱया षटकाच्या पहिल्या चेंडूवर जॉनी बेअरस्टॉ आणि मोईन अलीची विकेट घेत हिंदुस्थानला विजयी ट्रकवर आणले.