Team India Hockey – 52 वर्षांनंतर हॉकीत पुन्हा कारनामा, कांस्यपदक जिंकून केला विक्रम

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने Paris Olympics 2024 मध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा 2-1 ने पराभव केला आहे. विशेष म्हणजे या विजयासहित टीम इंडियाने 52 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. 2020 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे मागील 52 वर्षांमध्ये सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये टीम इंडियाने कांस्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत हिंदुस्थानला विजय मिळवून दिला. तसेच गोलरक्षक श्रीजेशने सुद्धा जबरदस्त कामगिरी करत स्पेनचे आक्रमम परतून लावले. त्यामुळे टीम इंडियाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. 1972 सालानंतर पहिल्यांदाच टीम इंडियाच्या हॉकी संघाने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. 1950, 1960 आणि 1970 च्या दशकांमध्ये हिंदुस्थानचा हॉकीवर दबदबा होता. 1948 ते 1972 च्या दरम्यान हिंदुस्थानने हॉकिमध्ये 3 सुवर्णपदक, 3 कांस्यपदक आणि एक रौप्यपदक जिंकले होते. तसेच हिंदुस्थानच्या हॉकी संघाने सलग 7 वेळा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा कारनामा सुद्धा केला आहे. Paris Olympics 2024 मध्ये हॉकी संघाने आपले 13 वे ऑलिम्पिक पदक जिंकले.