>> विठ्ठल देवकाते
फिरकीला अनुकूल असलेल्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर उद्या गुरुवार, 24 ऑक्टोबरपासून हिंदुस्थान आणि न्यूझीलंडदरम्यान महत्त्वपूर्ण असा दुसरा कसोटी क्रिकेट सामना रंगणार आहे. बंगळुरूतील पहिल्या कसोटीत पराभव झाल्याने पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाला तीन सामन्यांच्या मालिकेतील अस्तित्व राखण्यासाठी विजय अनिवार्य असेल. दुसरीकडे हिंदुस्थानातील कसोटी विजयाचा 36 वर्षांपासूनचा दुष्काळ संपविल्याने पाहुण्या न्यूझीलंडला आता ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न पडू लागलेय. पुण्याची खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहील, असा अंदाज आहे. उभय संघांकडे तोलामोलाचे फिरकीवीर असल्याने ‘ज्याची फिरकी भारी तोच मारणार बाजी’ असेच उद्यापासून सुरू होणाऱया पुणे कसोटीचे चित्र असेल.
तोडीस तोड फिरकीपटू
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडे तोडीस तोड फिरकी गोलंदाजीचा ताफा आहे. यजमानांकडे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल असे अनुभवी फिरकीवीर आहेत. दुसरीकडे पाहुण्या संघाकडेही ईश सोढी, मिचेल सॅण्टनर, एजाज पटेल या अनुभवी फिरकीपटूंसह रचिन रवींद्र व ग्लेन फिलिप्स असे कामचलाऊ फिरकी गोलंदाजही आहेत. पुण्याची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असली तरी फलंदाजीसाठी ती कठीण आहे असे नाही. त्यामुळे या काळय़ा मातीतील खेळपट्टीचा फायदा नेमका कोणाला मिळणार, यावर या कसोटीचा निकाल अवलंबून असेल.
गिल की राहुल?
मानेच्या दुखापतीतून सावरलेला शुभमन गिल आता तंदुरुस्त झाला आहे, मात्र त्याला पुणे कसोटीत खेळविण्यासाठी कोणाचा पत्ता कट करायचा ही सोपी गोष्ट नाहीये. कारण बंगळुरू कसोटीत गिलच्या जागेवर संधी मिळालेल्या सरफराज खानने दीड शतक ठोकून आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीतपणे वाजवून दाखविले आहे. त्याला गिलसाठी बाकावर बसविणे हा त्याच्यावर अन्याय ठरेल. उद्या नाणेफेकीपर्यंत संघनिवडीतील सस्पेन्स कायम राहणार असल्याने या घडीला तरी गिलसाठी लोकेश राहुलला बाहेर बसविणे एवढाच पर्याय दिसतो. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये आठ शतकांसह 15 अर्धशतके ठोकणाऱया राहुलवर एका कसोटीतील अपयशाने अविश्वास दाखविण्याइतकी नक्कीच संघनिवड समिती दुधखुळी नाहीये. त्यामुळे गिल की राहुल? या प्रश्नाचे उत्तर उद्याच कळेल.
तीन अष्टपैलू खेळाडू खेळविणार!
फलंदाजीतील खोली वाढविण्यासाठी हिंदुस्थानी संघ दुसऱया कसोटीत तीन अष्टपैलू खेळाडू उतरविण्याची शक्यता अधिक आहे. अशा समीकरणासाठी कुलदीप यादवला खाली बसवून अक्षर पटेल किंवा वॉशिग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात आघाडीची फळी कोलमडल्यानंतर तळाच्या फलंदाजांनाही प्रतिकार करता आला नव्हता. दुसऱया डावातही 3 बाद 408 अशा सुस्थितीतून टीम इंडियाचा डाव 462 धावांवर संपला होता. त्यामुळे मालिकेतील आव्हान राखण्यासाठी विजयाची गरज असल्याने टीम इंडिया तीन अष्टपैलू खेळाडूंना खेळविण्याचा विचार करू शकते. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराचे खेळणे निश्चित असून दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज की आकाश दीप हेदेखील सामन्यापूर्वीच कळेल.
पंत खेळणार, राहुललाही समर्थन – गौतम गंभीर
ऋषभ पंत दुखापतीतून सावरला असून तो उद्या (दि.24) यष्टिरक्षण करेल. लोकेश राहुललाही आमचे समर्थन असेल, असे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बुधवारी पुणे कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गौतम गंभीर म्हणाले, ‘हे बघा, सोशल मीडिया आमची प्लेइंग इलेव्हन ठरवत नाही. सोशल मीडियावर लोक किंवा तज्ञ काय विचार करतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. संघ व्यवस्थापन काय विचार करते हे अधिक महत्त्वाचे आहे. कानपूरच्या कठीण खेळपट्टीवर के. एल. राहुलने सुरेख फलंदाजी केली होती. त्यामुळे आमचे संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवेल, मात्र पुणे कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये राहुलचा समावेश होईल की नाही, हे गौतम गंभीरने उघड केले नाही. शुबमन गिलबद्दल बोलताना गंभीर म्हणाले, गेल्या सामन्यापूर्वी त्याला दुखापतीमुळे दुखापत झाली होती. तोही दुखापतीतून सावरला असून फॉर्ममध्ये आहे. आम्ही उद्या योग्यच संघ मैदानात उतरवू,’ असे सांगून त्यांनी संघनिवडीतील सस्पेन्स कायम ठेवला.
संभाव्य उभय संघ
हिंदुस्थान – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), के. एल. राहुल/सरफराज खान, आर अश्विन/वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव.
न्यूझीलंड – टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साऊदी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुक.