आधी शिक्षकाचे अपहरण, नंतर जबरदस्तीने विवाह; कुटुंबियांची पोलिसात धाव

बिहार लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणाचे लग्नासाठी अपहरण करण्यात आले आहे. हा तरुण शिक्षक असून त्याला अपहरणकर्त्यांनी मारहाणही केल्याचा आरोप त्याच्या घरच्यांनी केला आहे. शिक्षकाने लग्नास नकार दिल्याने त्याला ही मारहाण केली असं त्याच्या घरच्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे या तरुणाच्या गावात संतापाचे वातावरण आहे. या तरुणाचे शाळेच्या आवारातूनच अपहरण करण्यात आले होते. बंदुकीचा धाक दाखवून त्याला पळवून नेण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच शाळेचे मुख्याध्यापक व कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षक गौतम यांचे रेपुरा येथील अपग्रेडेड मिडल स्कूलमधून अपहरण करण्यात आले. बुधवारी दुपारच्या सुमारास चारचाकी मधून काही जण शाळेत आले आणि त्यांनी गौतमला जबरदस्तीने पळवून नेले. अपहरण झालेल्या शिक्षकाला बेदम मारहाण करून बंदुकीच्या जोरावर लग्न करण्यास भाग पाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गौतम बेपत्ता होताच कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर देधपुरा गावातून अपहरण झालेल्या गौतमची पोलिसांनी सुटका केली. त्याच्यासोबत त्याची नवविवाहित वधूही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले असून पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार रेपुरा गावातील रहिवासी राजेश राय यांनी गौतमच्या अपहरणाचा कट रचला होता. त्याने गौतमचे भरदिवसा शाळेच्या आवारातून बंदुकीच्या धाकावर अपहरण करवले होते. आपल्या मुलीशी लग्न लावून देण्यासाठी त्याने गौतमचे अपहरण करवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.