10 जून रोजी होणारी मुंबई व नाशिक शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे. शिक्षक पदवीधर निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. निवडणूक आयोगाने आता अनिश्चित काळासाठी ही निवडणूक पुढे ढकलली होती.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार होते, तर 13 जूनला मतमोजणी केली जाणार होती. मात्र, यातील बहुतांश शिक्षक हे लोकसभा निवडणुकांमध्ये व्यग्र आहेत. तसंच, मे महिन्याच्या सुट्टीत बाहेर जाणारे शिक्षक व कर्मचारी 10 जून रोजी निवडणूक झाल्यास मतदानापासून वंचित राहतील. त्यामुळे जूनच्या शेवटी मतदान घ्यावे अशी मागणी शिक्षक भारतीने याचिकेत केली होती.
ही निवडणूक 15 जूननंतर म्हणजेच शाळा सुरू झाल्यावर घेण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली होती. शिक्षक भारतीच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकिलांनी शिक्षक भारतीच्या मागणीचा विचार करून उद्या अंतिम निर्णय घेऊ असे न्यायालयासमोर सांगितले होते. त्या सगळ्याचा विचार करून ही निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.