कोरेगावात चिमुकल्यावर तरसाचा हल्ला, वडिलांनी झुंज देत तरसाला पिटाळले

कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील बाळूबाचा डोंगर परिसरातील तरस खोरे नावाच्या शिवारात वडिलांबाबत शेतात गेलेल्या 5 वर्षांच्या संकेत संतोष मदने या चिमुकल्यावर तरसाने हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याच्या तोंडासह डोक्यामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. मात्र, प्रसंगावधान राखून वडिलांनी तरसाबरोबर निकराचा लढा देऊन मुलाचा जीव वाचवला.

पिंपरी येथील बाळूबाचा डोंगर परिसरातील तरस खोरे नावाच्या शिवारात संतोष दाजी मदने हे शेळ्या चरण्यासाठी पाच वर्षांचा मुलगा संकेत मदने याला घेऊन गेले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वडिलांपासून सुमारे वीस ते पंचवीस फूट अंतरावर संकेत खेळत होता. वडिलांचे लक्ष शेळ्या चरण्यात गुंतले असताना अचानक मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. वडिलांनी पाठीमागे फिरून पाहिले असता, तरसाने मुलाचे डोके तोंडात धरल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ तरसावर झडप घालून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. अचानक हल्ला झाल्यामुळे तरसाने मुलाचे डोके सोडून संतोष मदने यांच्यावर हल्ला केला. परंतु, संतोष मदने यांनी निकराचा लढा देऊन तरसाला पिटाळून लावले. तरसाने चिमुकला संकेत मदने याचे डोके जबडय़ात धरल्यामुळे त्याच्या गालासह डोक्यात दाताच्या गंभीर जखमा झाल्या असून डोके रक्ताने माखले होते. या घटनेची माहिती संतोष मदने यांनी कुटुंबीयांसह मित्रांना दिली. जखमी संकेत मदने याला रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम मदने यांनी जखमी संकेत मदने याची तपासणी करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. अधिक उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.