मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर

दिल्ली येथे होणाऱया 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य, लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक, ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. सरहद संस्थेतर्फे आयोजित हे संमेलन दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न होणार आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर डॉ. भवाळकर यांच्या नावाची निवड करण्यात आली, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उज्ज्वला मेहेंदळे, प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिताराजे पवार, रवींद्र शोभणे, राजन लाखे, प्रदीप दाते आदी यावेळी उपस्थित होते.

दिल्ली येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱया या संमेलनाची रुपरेषा या बैठकीत निश्चित करण्यात आली. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन दुपारी चार वाजता होणार असून, सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुसऱया दिवशी सकाळी नामवंताची मुलाखत होणार आहे. तसेच, ‘देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य’, ‘मराठी आणि महाराष्ट्र धर्म’, ‘लेखक राजकारण्यांशी मनमोकळा संवाद’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता’, ‘बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती आणि जीवन’, ‘मराठीचा अमराठी संसार’, या विषयांवर परिसंवाद होणार आहे. तसेच, मधुरव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये बहुभाषिक आणि निमंत्रितांचे अशी दोन कविसंमेलने होणार आहेत.

सरहद संस्थेला दिल्लीत संमेलन आयोजनाचा मान मिळाला. याआधी 1954 मध्ये दिल्लीत संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षपद लक्ष्मणशास्त्राr जोशी यांनी भूषविले होते. 70 वर्षांनंतर पुन्हा दिल्लीत 98 वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

हा लोकसंस्कृतीचा सन्मान!

माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात महाराष्ट्राने मला हा मान दिला, याबद्दल मला मनापासून बरं वाटतंय. मी जन्मभर लोकसाहित्य, लोकनाटय़ आणि नाटय़ यामध्ये रस घेत आले. सर्वसामान्य माणसांचे जीवन सातत्याने माझ्या साहित्यात प्रतिबिंबीत होत गेलं. त्यामुळे जात्यावर दळण दळणाऱया भगिनींपासून ते सगळे लोककलावंत, लोकपरंपरेने निर्माण केलेली भाषा, साहित्य या सर्वांचा हा सन्मान आहे असे मला वाटतं. मी केवळ निमित्तमात्र आहे, अशा भावना डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केल्या.

तळागाळातील लोकांच्या साहित्याला अडाणी लोकांनी निर्माण केलेले साहित्य म्हणणे याला माझा पूर्ण विरोध आहे. अनक्षर आणि अडाणी यात फार मोठा फरक आहे. साक्षर होण्याची संधी परंपरेने फार थोडय़ा लोकांना दिली. शिक्षण आणि शहाणपण यात फार मोठे अंतर आहे. लोकपरंपरेतील जनता शहाणी आहे. जीवनाचा विचार करणारी आहे. मग त्यांच्या चालीरिती, उपासन-विधी असतील, जागरण गोंधळ व अन्य कलेची मूळं लोकसंस्कृतीत दिसतात. अभिजन संस्कृती त्यातून उन्नत होत गेली. लोकसंस्कृतीचा शोध घेण्याच्या आनंद मी फक्त जन्मभर घेत आले. तो आनंद हाच माझा सगळय़ात मोठा पुरस्कार आहे, असे त्या म्हणाल्या.

भाषा टिकवण्याची जबाबदारी मराठी माणसाची

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. सरकारी पातळीवर दिला गेलाय, समाधान आहे. मला असं वाटतंय की, समाजामध्ये उच्चभ्रूंच्या भाषेला नेहमी सन्मान दिला जातो. सर्वसामान्यांच्या भाषेला डावललं जातं. जुन्या काळात संस्कृतला मोठेपणा दिला जायचा. आजच्या काळात इंग्रजीला मोठेपणा मिळतोय. तुमच्या आमच्या भाषेला दुय्यम का मानायचे. आपल्या भाषेबद्दल अस्मिता असली पाहिजे. सामान्य माणूस जोपर्यंत त्याची भाषा चलनात ठेवतो, तोपर्यंत भाषा टिकते. त्यामुळे मराठी माणसाचीच ती जबाबदारी आहे असे भवाळकर म्हणाल्या.

आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक

डॉ. भवाळकर यांचा साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाटक यांच्यावर सखोल अभ्यास आहे. त्यांची ख्यातनाम लेखिका, संशोधक संदर्भ कोष, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या अभ्यासक, संस्कृतीपासून आधुनिक स्त्राrवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक अशी ओळख आहे. डॉ. भवाळकर यांनी 1958 ते 1970 या काळात माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केले. 1970 ते 1999 दरम्यान सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पीएचडी प्रबंधाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वेत्कृष्ट प्रबंध पुरस्काराने गौरविले आहे.

माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात महाराष्ट्राने मला हा मान दिला. मला खूप आनंद वाटतोय. जात्यावर दळण दळणाऱया भगिनींपासून ते सगळे लोककलावंत, लोकपरंपरेने निर्माण केलेल्या साहित्याचा हा सन्मान आहे!