धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, तामीळनाडूच्या राज्यपालांचे विधान

हिंदुस्थानातील नागरिकांची घोर फसवणूक झाली आहे.  धर्मनिरपेक्षता ही संकल्पनाच मुळात युरोपियन आहे. हिंदुस्थानात त्याची अजिबात गरज नाही, असे विधान तामिळनाडूच्या राज्यपालांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून आर एन रवी आणि एनडीए सरकारवर जोरदार टीका होत आहे. एका घटनात्मक पदावरील व्यक्तीने अशाप्रकारची विधाने करणे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे. दरम्यान, कन्याकुमारी येथे एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात राज्यपालांनी धर्मनिरपेक्षतेवर भाष्य केले.

राज्यपालांना संविधानही युरोपियन संकल्पना वाटते अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या वृंदा करात यांनी राज्यपाल आर एन रवी यांच्यावर केली आहे. तर काँग्रेसचे तामीळनाडूतील खासदार मणिकम टॅगोर यांनी राज्यपालांचे विधान संविधानविरोधी असल्याचा आरोप केला आहे. परंतु, हिंदुस्थानात आम्ही सर्व धर्मांचा, संस्कृतीचा आदर करतो आणि हीच धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे, असेही मणिकम यांनी म्हटले आहे.