मेट्रो पुलावरून वाहणारे पाणी साठवण्यासाठी उपाययोजना करा

पावसाचे पाणी मेट्रो पुलावरून खालच्या रस्त्यावर वाहते. यामुळे पादचाऱ्यांची आणि वाहनांची गैरसोय तर होतेच शिवाय मौल्यवान पाण्याचा अपव्यय देखील होतो. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी वाहून त्याचा अपव्यय होण्याऐवजी त्याची साठवणूक करून त्याचा पुनर्वापर करता येईल यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी जयंत जोशी यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरात सर्वत्र मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यासाठी ठिकठिकाणी मेट्रोचे खांब उभारले आहेत. मेट्रोच्या खांबाला जोडलेले पाईप मेट्रो स्टेशनमध्ये साचलेले लाखो लिटर पाणी सोडतात. मेट्रो पुलाखालील पाण्याचे पाईप जमिनीखालून टाकण्यात आलेले नाहीत, तसेच या पाईपमधील पाण्याचा योग्य वापर होत नाही. हे पाणी झाडांना पाणी देणे किंवा इतर कामांसाठी वापरण्याऐवजी वाया जात आहे. वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावरील लोकांची अडचण होत असून, दरवर्षी लाखो लिटर पाणी वाया जाते असे जयंत जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

वाहते पाणी गोळा करण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम लागू करा. त्यामुळे गोळा केलेले पाणी नंतर लँडस्केपिंग, साफसफाई किंवा सार्वजनिक स्वच्छता सुविधांसाठी विविध कारणांसाठी वापरले जाऊ शकते. तसेच पाणी वाहून जाण्याऐवजी योग्यरित्या पाणी साठवून त्याचा पुनर्वापर केला जाईल यासाठी प्रभावी ड्रेनेज सिस्टम लागू करा, अशी मागणी देखील त्यांनी केली.