जगज्जेतेपदासाठी तिरंगी लढाई; इतिहास रचण्यासाठी हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका सज्ज

चोकर्स विरुद्ध चोकर्स… एक आजवर उपांत्य सामन्यातच दम तोडतोय तर दुसरा जेतेपदाच्या संघर्षात आडवा होतोय… दोघांनाही आपल्यावर असलेला पराभवाचा शिक्का पुसायचाय. दोघेही अंतिम फेरीत नॉनस्टॉप पोहोचलेत. सलग आठ सामने अपराजित असलेले दोन्ही संघ जगज्जेतेपदाच्या लढतीत एकमेकांशी भिडणार आहेत. दोघांच्याही जगज्जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीत पाऊस आडवा येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपचा जगज्जेतेपदाचा सामना हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा नव्हे तर हिंदुस्थान-द. आफ्रिका विरुद्ध वरुणराजा असा रंगणार, असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे.

दोन्ही उपांत्य सामन्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. आता तो अंतिम सामन्यासाठी बार्बाडोस मुक्कामी आहे. त्याच्या उपस्थितीमुळे दोन्ही सामने एकतर्फी झाले. अंतिम सामन्यावरही 75 टक्के पावसाचे संकट आहे. त्यामुळे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज झालेले दोन्ही संघ पावसाच्या संकटाशीही भिडण्याची तयारी करताहेत. या सामन्यात नाणेफेक निर्णायक असला तरी जिंकणारे संघच हरलेत. त्यामुळे दिवस कुणाचा असेल ते सांगणे कठीण आहे.

आतातरी विराट खेळशील का…
गेल्या आठपैकी सात सामन्यांत विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा प्रयोग हिंदुस्थानने केला खरा, पण एक खेळी वगळता विराट पूर्णपणे अपयशीच ठरला आहे. त्याच्या जागी अन्य दुसरा खेळाडू असता तर संघाबाहेरही फेकला गेला असता, पण विराटला सलामीवीर म्हणून नॉनस्टॉप संधी देण्यात आली. आता स्पर्धेचा अंतिम सामना आहे आणि महत्त्वाच्या सामन्यात जबरदस्त खेळणाऱया विराट कोहलीकडून सर्वांना मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे.

टीम इंडिया इतिहास बदलणार
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकाने आपापले योगदान दिले आहे. त्यात फलंदाजीत रोहित शर्मा तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराने आघाडी घेतली असली तरी सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे यांनी फलंदाजीत खारीचा वाटा उचलला आहे. गोलंदाजीत कुलदीपच्या फिरकीला कसलीच तोड नाही. त्यात अक्षर पटेल, अर्शदीप सिंह यांनीही कमाल केलीय. सारेच वेळोवेळी खेळल्यामुळे हिंदुस्थान इतिहास बदलण्याच्या अन् स्वप्न साकार करण्याच्या उंबरठय़ावर पोहोचलाय. उद्या बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मात करून गेल्या 11 वर्षांतील अपयशाची मालिका खंडित करण्याचे ध्येय उराशी बाळगूनच टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. हिंदुस्थानने 2013 साली शेवटची आयसीसी ट्रॉफी म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याआधी 2007 साली टी-20 वर्ल्ड कप, 2011 साली आयसीसी वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र 2014 साली टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून मात खाल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या पदरी गेल्या दहा वर्षांत केवळ अपयशच पडत आले आहे.

रोहित शर्मा वर्तुळ पूर्ण करणार
हिंदुस्थानचा संघ टी-20 वर्ल्ड कपचा पहिलावहिला वर्ल्ड कप 2007 साली खेळला होता. तो रोहित शर्माचाही पहिलाच वर्ल्ड कप होता. त्यानंतर तो सलग नवव्यांदा वर्ल्ड कप खेळतोय. पण त्यानंतर एकदाही जगज्जेतेपदाची पुनरावृत्ती करता आली नव्हती. रोहितचा शेवटचा वर्ल्ड कप असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या कारकीर्दीचा शेवट जगज्जेतेपदासह करून एक अनोखे वर्तुळ पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तसेच त्याला गेल्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि वन डे वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात आले अपयश धुऊन काढण्याचीही नामी संधी पुन्हा प्राप्त झाली आहे. गेल्या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून मात खावी लागली होती. मात्र या स्पर्धेत हिंदुस्थानने सुपर एटमध्येच त्याचा बदला घेत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे.

विजयानवमी साजरी करणार
दक्षिण आफ्रिकेचा संघ 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये दुर्दैवीरीत्या उपांत्य सामन्यात हरला होता. त्यानंतर त्यांचा संघ आयसीसी वर्ल्ड कपच्या एकाही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला नव्हता. त्यामुळे या दिग्गज संघावर चोकर्सचा शिक्का बसला होता. 1992 पासून त्यांच्यावर बसलेला चोकर्सची जखम अश्वत्थाम्याप्रमाणे भळभळून वाहतेय. त्यावर एकदाही जगज्जेतेपदाची मलम लावण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. तब्बल 32 वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी प्रथमच वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठलीय. तीसुद्धा सलग आठ विजय नोंदवत. हिंदुस्थानप्रमाणे त्यांचीही फलंदाजी खोलवर आहे. त्यांच्या संघात क्विंटन डिकॉक, रीझा हेंड्रिक्स, कर्णधार एडन मार्करम, डेव्हिड मिलर, हेन्रीक क्लासन, माकाx यानसन, ट्रिस्टन स्टब्जसारखे झंझावाती फलंदाज आहेत. टी-20 क्रिकेट पॉवर गेम असल्यामुळे यात कुणाचेही सातत्य कायम नसतो. कुणाचाही फॉर्म केव्हाही येऊ शकतो. दुसरीकडे गोलंदाजी पॅगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया आणि माकाx यान्सनसह केशव महाराज- तबरेज शम्सीची फिरकीही कमाल करतेय. या साऱयांचे ध्येय संघाला पहिलेवहिले जगज्जेतेपद मिळवून देण्याचेच आहे.