गतविजेता इंग्लंडचा संघ उद्या (दि. 4) स्कॉटलंडविरूद्धच्या लढतीने आपल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे अंतिम तयारीत अडथळा आल्याने इंग्लंडसाठी स्कॉटलंडविरुद्धची लढत तशी सराव सामन्यासारखीच असेल. इंग्लंडचा फिल सॉल्ट आयपीएलमधील आपला फॉर्म कायम राखण्यास उत्सुक असून, जोफ्रो आर्चरच्या पुनरागमनामुळे इंग्लंडच्या गोलंदाजीची धार वाढली आहे.
मायदेशात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडला टी-20 वर्ल्ड कपची रंगीत तालीम करता आली नाही. मात्र, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ तिसऱयादा जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी मैदानावर सर्वस्व पणाला लावताना दिसेल. इंग्लंडला ‘ब’ गटात स्कॉटलंडसह पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया, नामिबिया व ओमन यांना सामना करायचा आहे. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या धक्कादायक पराभवानंतर स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत इंग्लंडला गाफील राहून चालणार नाहीये. कारण इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुद्धही वन डे व टी-20 मालिका गमावलेली आहे. त्यामुळे स्कॉटलंडविरुद्धही असाच धक्कादायक निकाल लागला तर मग इंग्लंडवर गटफेरीत गारद होण्याची नामुष्की ओढवू शकते.
सलग तिसऱयांदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळत असलेला स्कॉटलंडचा संघ कागदावर तरी इंग्लंडपुढे काहीच नाहीये. मात्र, युरोपियन क्वालिफायर स्पर्धेत सर्व सहा लढती जिंकून स्कॉटलंडने निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. गुणतक्त्यात अव्वल स्थानी राहत टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट बुक करणाऱया स्कॉटलंडच्या संघाला इंग्लंडपुढे गमाविण्यासारखे काहीच नसेल. त्यामुळे इंग्लंडचा संघ स्कॉटलंडला कमी लेखण्याची चूक करणार नाही एवढं नक्की.
अफगाणिस्तान, युगांडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच भिडणार
डार्क हॉर्स समजला जाणारा अफगाणिस्तान व युगांडा हे दोन संघ टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या निमित्ताने प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सकाळी सहा वाजता (हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार) भिडणार आहेत. ‘क’ गटातून यजमान वेस्ट इंडीज व न्यूझीलंड हे दोन संघ सुपर-8चे प्रमुख दावेदार आहेत. मात्र, या दोन्ही संघांतील एकाचा पत्ता कट करण्यासाठी अफगाणिस्तानचा संघ युगांडा व पापुआ न्यू गिनी या संघांविरुद्ध मोठे विजय मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.
दुसरीकडे वर्ल्ड कपमधील पदार्पण करणारा युगांडाचा संघही अफगाणिस्तानविरुद्ध संस्मरणीय विजय मिळविण्यासाठी मैदानावर सर्वस्व पणाला लावताना दिसेल. पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेसारख्या संघाला पराभूत करून युगांडाने आपली क्षमता दाखविलेली आहे. अफगाणिस्तानकडे कर्णधार राशीद खानसह रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, मोहम्मद नबी व अजमलतुल्लाह ओमरजई असे मॅचविनर खेळाडू आहेत. दुसरीकडे युगांडाची मदार फलंदाजीत जर मुसाका याच्यावर, तर गोलंदाजीत अल्पेश रामजानी याच्यावर असेल.