सुन्या सुन्या मैफलीत माझ्या…टी-20 वर्ल्ड कपच्या बहुतांश सामन्यांना रिकाम्या खुर्च्याच असणार साक्षीदार

काल टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशी यजमान संघांनी विजयारंभ केला. विजयामुळे दोन्ही यजमान सुखावले असले तरी वेस्ट इंडीज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये कर्फ्यू लागल्यासारखा शुकशुकाट पाहून सर्वांना धक्का बसला असेल. पण  टी-20 वर्ल्ड कपचा हा थरार सुन्या सुन्या मैफलीत पार पडणार असल्याचे कल्पना आधीपासूनच सर्वांना आहे. त्यामुळे पुढेही अनेक सामन्यांत अशाच रिकाम्या खुर्च्याच साक्षीदार असतील.

टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन प्रथमच अमेरिका आणि वेस्ट इंडीज या देशांनी मिळून केलेय. अमेरिकेत तर क्रिकेटचे भव्य आयोजन पहिल्यांदाच होतेय. त्यामुळे तिथे काही प्रमाणात क्रिकेट चाहत्यांना स्पर्धेबाबत उत्सुकता आहे, पण तीसुद्धा अमेरिका आणि हिंदुस्थानी संघाच्या सामन्यांची. यजमान म्हणून अमेरिकेच्या प्रत्येक सामन्याला मोठय़ा संख्येने गर्दी होईल याचे यजमानांनी चांगले प्लॅनिंग केल्याचे कळते. तसेच हिंदुस्थानचे चारही सामने सोल्ड आऊट झालेत. त्यामुळे या सामन्यांना गर्दी असेल, पण अन्य लिबूं-टिंबू संघांबरोबर होणाऱया सामन्यांना प्रेक्षकांची उपस्थिती अत्यल्पच राहील. काल विंडीजच्या सामन्याला पाचशेही प्रेक्षक नसल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी वेस्ट इंडीजला चांगलेच ट्रोल केले.

हिंदुस्थानच्या सामन्यांना हिंदुस्थानी चाहत्यांना पाहता यावे म्हणून आपले सर्व साखळी सामने रात्री 8 वाजता खेळविले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्यक्ष सामने अमेरिकेत सकाळी दहा वाजता खेळले जातील. त्यामुळे इतक्या सकाळी जाऊन सामने पाहण्याची अपेक्षा अमेरिकन चाहत्यांकडून बाळगणे चुकीचे आहे. मात्र हिंदुस्थानी चाहते मोठय़ा प्रमाणात अमेरिकेत असल्यामुळे किमान हिंदुस्थानी सामन्यांना गर्दी असेल, पण अन्य संघांच्या सामन्यांना गर्दी होण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही.

विंडीजमध्ये क्रिकेटची व्रेझ संपलीय

विंडीजचे क्रिकेटपटू जगभरातील लीगमध्ये खेळत असले तरी पॅरेबियन बेटांवर क्रिकेटची व्रेझ संपली आहे. हे सामने टी-20 चे असले तरी सकाळी आणि दुपारी होणाऱया लढतींना प्रेक्षकांची शक्यताच नाही. त्यातच पॅरेबियन बेटांची लोकसंख्याही फार कमी असल्यामुळे हजारोंच्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी आयोजकांना प्रेक्षकांना आणि शालेय मुलांना मोफत तिकिटांचे वितरण करावे लागणार आहे.

टी-20 ची गर्दी टीव्ही, ओटीटीवरच

वर्ल्ड कपच्या सामन्यांना गर्दी जमवणे सोपे नसल्याचे गेल्या वर्षी हिंदुस्थानात झालेल्या वर्ल्ड कपदरम्यानही दिसून आलेय. त्यामुळे यंदाची टी-20 वर्ल्ड कप स्टेडियममधील प्रेक्षकांपेक्षा हिंदुस्थानातील चाहत्यांना समोर ठेवून आखण्यात आला आहे. हिंदुस्थानसह पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड  आणि इंग्लंडचे सामनेही त्यांच्या वेळेनुसार खेळविले जाणार आहेत. त्यामुळे स्टेडियममध्ये गर्दी नसली तरी टीव्ही आणि ओटीटीवर कोटींच्या संख्येने दर्शक सामने पाहतील हे निश्चित आहे. स्टेडियमची तिकिटे विकून मिळणाऱया उत्पन्नापेक्षा थेट प्रक्षेपणामुळे होणारे उत्पन्न शेकडो पटीने अधिक असते. एकटय़ा हिंदुस्थानातच पाच कोटी दर्शक एकावेळेला क्रिकेटचे सामने पाहत असल्याचे आकडे समोर आलेत.