टी-20 वर्ल्ड कपचा रंग अमेरिकन क्रिकेट चाहत्यांमध्ये हळूहळू चढेलच, पण या वेगवान खेळाने दुसऱयाच दिवसापासून आपले थरारक रंग दाखवायला सुरुवात केलीय. आधी गोलंदाजीत कमाल दाखवणाऱया 39 वर्षीय डेव्हिड व्हिसीने सुपर ओव्हरमध्ये आपल्या अष्टपैलू खेळाने धम्माल उडवून दिली. त्याच्या सुसाट कामगिरीने नामिबियाला ओमानविरुद्ध सुपर्ब विजय मिळवून दिला.
टी-20 क्रिकेटमधील लिंबू-टिंबू असलेल्या ओमान आणि नामिबियाला आज टी-20 ला साजेसा वेगवान खेळ करता आला नाही. मात्र 110 धावांच्या माफक आव्हानासाठीही दोघे लढले आणि झुंजले. या कमी धावांच्या थरारक सामन्यात अष्टपैलू धमाका करणारा व्हिसीच विजयाचा शिल्पकार ठरला.
व्हिसीची अष्टपैलू धमाल
व्हिसीलाच शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढता आल्या नाहीत आणि सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये त्यानेच बॅट हातात घेतली आणि बिलाल खानच्या पहिल्या चार चेंडूंवर 6,4,2,1 अशा 13 धावा चोपल्या, तर कर्णधार गेरहार्ड इरासमसने दोन चौकार ठोकत ओमानसमोर 22 धावांचे अवघड लक्ष्य ठेवले. त्यानंतर व्हिसीनेच आपल्या हाताच चेंडू घेत नसीम खुशीचा त्रिफळा उडवत ओमानला केवळ दहा धावाच देत नामिबियाचे विजयाचे खाते उघडले.
12 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये सुपर ओव्हर
ओमानचा संघ 109 धावांवर गुंडाळल्यावर विजयाचा घास नामिबियाच्या तोंडात होता, पण मेहरान खानने तो हिरावून घेतला. शेवटच्या सहा चेंडूंत अवघ्या पाच धावांची गरज होती, पण मेहरान खानने पहिल्या तीन चेंडूंत अवघी एक धाव देत 2 विकेट घेत सामन्याला कलाटणी दिली. मग शेवटच्या चेंडूंवर दोन धावा हव्या होत्या, पण त्याच्या अचूक चेंडूने डेव्हिड व्हिसीला चकवले आणि सामना बरोबरीत सोडवला. मेहरानच्या या अनपेक्षित माऱयामुळे तब्बल 12 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला.
ट्रम्पलमनची अफलातून सुरुवात
रूबेन ट्रम्पलमनने नामिबियाला भन्नाट सुरुवात करून देताना सामन्याच्या पहिल्याच दोन चेंडूंवर ओमानच्या दोघांना पायचीत करण्याचा पराक्रम केला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्याच दोन चेंडूंवर दोन विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. मग दुसऱया षटकात नसीम खुशीलाही बाद करत त्याने ओमानची 3 बाद 10 अशी अवस्था केली. त्यानंतर झिशान मकसूद (22), खालिद काईल (34) यांच्या खेळामुळे ओमानच्या डावाला आकार आला. मात्र डेव्हिड व्हिसीने ओमानच्या उर्वरित फलंदाजांना तंबूत धाडत 109 धावांत त्यांच्या डावावर विराम लावला. ट्रम्पलमनने 21 धावांत 4, तर व्हिसीने 28 धावांत 3 विकेटस् घेतल्या. 110 धावांचा पाठलाग करताना ओमानच्या बिलाल खाननेही नामिबियाच्या मायकल लिंगेनला शून्यावर त्रिफळाचीत केले. मग निकोलास डेव्हिन (24) आणि जान फ्रायलिंकने (45) नामिबियाचा विजय सोपा केला होता. पण शेवटच्या तीन षटकांत ओमानने सामना फिरवला. 3 बाद 92 अशा सुस्थितीत असलेल्या नामिबियाला 3 षटकांत केवळ 17 धावाही काढता आल्या नाहीत.